जीवशास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले आहे की प्राण्यांच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेतील सर्वात महत्वाची पायरी म्हणजे पाठीचा कणा आडवा असण्यापासून उभा होण्याचा काळ. केवळ याच टप्प्यानंतर मानवी बुद्धि विकसित झालेली आहे. म्हणून या नैसर्गिक ऊर्जेच्या उद्रेकाचा वापर करून, महाशिवरात्रीच्या या रात्रभर चालणाऱ्या उत्सवात आपण योग्य प्रकारचे मंत्र आणि ध्यान यासह दिव्यत्वाच्या एक पाऊल जवळ जाऊ शकतो.

एखाद्या व्यक्तीच्या जीवनात साधना नसली तरीसुद्धा ऊर्जेची वाढ होते. परंतु विशेषतः कोणत्याही प्रकारच्या योगिक साधनेच्या मार्गात असलेल्या व्यक्तींसाठी शरीर उभ्या स्थितीत ठेवणे – किंवा वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर, या रात्री न झोपणे – हे अतिशय महत्वाचे आहे.

आध्यात्मिक मार्गावर असलेल्या व्यक्तींसाठी, तसेच कारकीर्द आणि कौटुंबिक जबाबदार्‍या असणार्‍या व्यक्तींसाठी सुद्धा महाशिवरात्री अतिशय महत्वाची आहे. कुटुंबात रममाण होणार्‍या लोकांसाठी महाशिवरात्री शंकराच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून साजरी केली जाते. महत्वाकांक्षी व्यक्ती याकडे शंकराने या दिवशी त्याच्या सर्व शत्रुंवर विजय मिळवला या नजरेने पाहतात. परंतु योग परंपरेत, आम्ही शंकराला देव मानत नाही, तर प्रथम गुरु किंवा आदि गुरु मानतो –जे योगाच्या विज्ञानाचे मूळ आहेत. “शिव” या शब्दाचा अर्थ “तो, जो नाहीये तो” असा आहे. तुम्ही जर स्वतःला अशा परिस्थितीत ठेऊ शकलात, की तुम्ही हे नसून शिव आहात, तर जीवनाकडे पाहण्याचा नवीन दृष्टीकोण मिळून जीवनाकडे संपूर्ण स्पष्टतेने पाहता येणे शक्य होईल.