सदगुरू, सृष्टी आणि सृष्टीकर्त्या विषयी बोलताना म्हणतात; लोक सृष्टीकर्ता पवित्र मानतात आणि सृष्टी अपवित्र; असे दोन्हींना विभागण्याचा प्रयत्न करतात.

सदगुरू याचा खुलासा करत म्हणतात, तुमच्या सभोवताली जे तुम्ही पाहता, त्यावरूनच तुम्ही ईश्वराची व्याख्या केलेली आहे, कारण बहुतेक लोकांना ईश्वर म्हणजे त्यांची स्वतःचीच एक अतिरंजित कल्पना.  पण जो काही सृष्टीचा स्रोत आहे तो केवळ तुम्ही अनुभवू शकता; पण कधीच त्याला समजू शकणार नाही.

सदगुरू: लोकांच्या दृष्टीने आत्मा पवित्र आणि शरीर अपवित्र असतं, हे असं कसं? आजवर असाच विचार करत आलो आहोत ना आपण? ईश्वर पवित्र आणि त्याची निर्मिती मात्र अपवित्र, असं कसं शक्य आहे?

मुळात ईश्वराचा विचार तुमच्या मनात येतो कारण, तुम्ही त्याची निर्मिती पाहता, हो की नाही? तुम्ही जन्माला आल्यावर डोळे उघडले तेंव्हा आजूबाजूला काय दिसलं? निव्वळ निर्मिती! तुम्ही इथे येण्याआधी बरंच काही घडून गेलंय, नक्कीच ती तुमची निर्मिती नाही, तेंव्हा तुमच्या मनात आलं की, कुणीतरी निर्माता असणार. अशाप्रकारे तुम्ही निर्मात्यापर्यंत जाऊन पोहोंचलात, हो की नाही?

ज्याक्षणी तुमच्या मनात निर्मात्याचा विचार आला त्या क्षणी तुम्ही स्वतः माणसाच्या रुपात असल्यामुळे तुम्हाला वाटलं की, ‘निर्माता म्हणजे कुणी मोठा माणूस असणार, कारण, माझ्यासारखा लहानसा माणूस हे एव्हढं सगळं कसं निर्माण करणार बरं; म्हणजेच तो कुणीतरी मोठा माणूस असणार. निव्वळ दोन हातांनी तो इतकी निर्मिती कशी करणार? त्याला कदाचित आठ हात असतील.’ हो की नाही? तुम्ही जर म्हैस असता तर तुम्हाला वाटलं असतं की, देव म्हणजे एक प्रचंड मोठी म्हैस आहे. वाटलं असतं की नाही? जा, जाऊन म्हशीला विचारा; तुमच्या लक्षात येईल की, देव म्हणजे भली थोरली, चार शिंगांची म्हैसच आहे असं त्या म्हशीला वाटत असणार.

इदी अमीन; माहिती आहे ना? युगांडाच्या त्या माणसाबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. इदी अमीनने जाहीर केलं की, ‘ईश्वर काळा आहे.’ मला मान्य आहे त्याचं म्हणणं. जर गोऱ्या माणसाचा देव गोरा असतो तर मग काळ्या माणसाचा देव काळा का असू शकत नाही?

परंतु, ही दोन्ही माणसं गोंधळलेली आहेत. देव आपण भारतीयांना भेटून गेला आहे त्यामुळे आपल्याला माहित आहे की, तो तर सावळा आहे; बरोबर ना?

टेन्नेस्सी इथल्या नॅश्व्हिल इथे मी काही लोकांशी बोलत होतो, जोक सांगत होतो त्यांना. त्या वेळेस मी ईश्वराचा उल्लेख ‘तो’ असा एकेरी केला. त्याबरोबर, काही महिला ताबडतोब उठून उभ्या राहत म्हणाल्या, ‘ईश्वर म्हणजे माणूस आहे असा तुमचा विश्वास आहे का?’ ह्याची परिणती कशात होणार ते माझ्या लगेच लक्षात आलं. मी म्हटलं, ‘हे पहा, मी जोक सांगतो आहे तुम्हाला.’ ‘ते काही असो, तुम्ही त्याचा उल्लेख ‘तो’ असा केला. म्हणजे ईश्वर हा माणूस आहे असा तुमचा विश्वास आहे का?’ त्यांच्याकडे जोकसुद्धा फार गांभीर्याने घेतला जातो.

आता, स्त्रियांचं म्हणणं आहे की, ईश्वर स्त्रीरूपात असू शकतो. केवळ त्या संस्कृतीमध्ये अशा समस्या उदभवू शकतात. आपल्या भारतात, ईश्वर नर रुपात आहे आणि नारी रुपात देखील आहे, गायीच्या रुपात आहे, वानराच्या रुपात आहे; अगदी प्रत्येक रुपात आहे; सरपटणारा आहे, रांगणारा आहे, उडणारा आहे; कारण भविष्यातील समस्यांचा अंदाज आपल्याला आधीच आला होता.

जेंव्हा माणूस ह्या ग्रहावरची सर्वात शक्तिशाली ताकद होता, तेंव्हा स्वाभाविकतः, माणूसच देव होता. आता स्त्रिया बलशाली होत आहेत, म्हणूनच प्रश्न करत आहेत की, ‘ईश्वर स्त्री का असू शकत नाही?’ मग समजा, उद्या जर कुत्रे अधिक शक्तिशाली झाले-तसे ते होतच आहेत- तर मग कुत्रे विचारतील, ‘ईश्वर कुत्र्याच्या रुपात का असू शकत नाही?’ कुत्र्याला इंग्रजीत ‘डी-ओ-जी’ म्हणतात, ‘जी-ओ-डी’ गॉड ह्या शब्दाशी किती साधर्म्य आहे त्याचं! अगदी तुमच्याहून जास्त, नाही का?

तेंव्हा लक्षात घ्या की, ईश्वर म्हणजे आपलीच अतिरंजित कल्पना आहे, हो की नाही? तुमच्या स्वतःची अतिरंजित कल्पना म्हणजे ईश्वर.

बघा, तुम्ही स्वतःची व्याख्या तरी करू शकताय का, नाही ना? तुम्ही कुठलीही व्याख्या केली तरी ती तितकीशी बरोबर ठरणार नाही. निदान, ह्या ‘एकाचं’ वर्णन करण्यासाठी अशी कुठलीच स्वतःबद्दलची व्याख्या पुरेशी पडणार नाही.

निर्मितीचं हे छोटसं रूप जर असं असेल, तर तो जो निर्माता आहे, त्याची व्याख्या तुम्ही कशी करणार आहात? तुम्ही ती नाहीच करू शकत, तुम्ही त्या निर्मितीला समजून घेऊ शकत नाही, तुम्ही केवळ त्याच्याशी एकरूप तेव्हढे होऊ शकता. तुम्ही त्याला अनुभवू शकता पण जाणू शकत नाही. त्यातून तुम्ही ज्ञान प्राप्त करून घेऊ शकत नाही. तुम्हाला ईश्वराबद्दल जी माहिती आहे ना, ती म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे; सांस्कृतिक मूर्खपणा आहे. तुम्ही ज्या संस्कृतीत आहात त्यानुसार तुमच्या ईश्वराचं रूप ठरतं, हो की नाही?

त्याचा फक्त अनुभव घेता येतो. अनुभवाचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याला चाखू शकता किंवा धरून ठेवू शकता. नाही, असं नाहीच. केवळ त्याच्यात विरून जाण्यामुळे तुम्ही त्याला अनुभवू शकता; ह्या व्यतिरिक्त दुसरा मार्ग नाही. म्हणूनच, आपण आता अशा या विरून जाण्याच्या पद्धती शोधत आहोत, ज्या योगे आपल्याहून प्रचंड महाकाय अशा काहीतरीची अनुभूती आपल्याला येऊ शकेल.