सद्गुरु: अनेक व्यक्तिंचा असा विश्वास असतो की प्रत्येक व्यक्तीसाठी एक “यथायोग्य-परिपूर्ण” व्यक्ती या जगात  असतेच. काहीजणांचा विश्वास असतो या गोष्टी ग्रह-तारे ठरवितात. काहीजण सृष्टीकर्त्यानेच आपला जीवनसाथी निवडलेला आहे अशी एक व्यापक कल्पनासुद्धा आहे. या दोन्ही समजुतींमागची धारणा आहे की मानवी प्रेमाच्या गाठी पृथ्वीवर नव्हे, तर स्वर्गात बांधल्या जातात

पण लोक हे विसरतात, की आत्मा कोणा आणि कशाही सोबत सहवास करत नाही. तसेच आत्म्याला कुठल्याही जोडीदाराची गरज देखील नाही. आपण जेंव्हा आत्म्याविषयी बोलतो, तेंव्हा आपण अशा आयामाबद्दल बोलतो जे स्वयं-परिपूर्ण आणि अनंत आहे. केवळ जे मर्यादित आहे, त्यालाच जोडीदाराची गरज भासते. जे अमर्याद, अनंत आहे ते एखादा जोडीदार का शोधेल?

वास्तवाचा स्वीकार करण्याचा फायदा हा आहे, की उद्या जेंव्हा तुम्हाला मर्यादांचा सामना करावा लागेल, तेव्हा त्या हाताळण्यासाठी तुम्ही परिपक्व मार्गांचा वापर कराल.

लोकांना जोडीदार का हवा असतो? त्याचे एक कारण म्हणजे शारीरिक गरजा असू शकतात; ज्याला आपण लैंगिकता म्हणतो, आणि तो सुद्धा जीवनाचा अतिशय सुंदर आयाम होऊ शकतो. दुसरे कारण मानसिक गरज असू शकते; आपण त्याला साहचर्य, मैत्री म्हणतो, आणि ते देखील अतिशय सुंदर असू शकते. अजून एक कारण म्हणजे भावनिक गरज; आपण त्याला प्रेम असे म्हणतो, आणि त्याचे वर्णन अतिशय आल्हाददायक, आनंददायी अनुभव म्हणून नेहेमीच करण्यात आलेले आहे. हे खरं आहे की शारीरिक सुसंगतता, साहचर्य आणि प्रेम यामुळे जीवन निश्चितच सुंदर बनु शकते, पण तुम्ही जर स्वतःशी प्रामाणिक असाल, तर पहाल की या प्रकारच्या देवाणघेवाणी आणि संबंधांमध्ये त्यापाठोपाठ येणारी चिंता-विवंचना तुम्ही नाकारू शकत नाही.

नातेसंबंधांच्या व्यावहारिकतेमधील मर्यादा आणि अटी याविषयी आपण जागरूक आणि प्रामाणिक असणे शहाणपणाचे ठरेल. वास्तवाचा स्वीकार करण्याचा फायदा हा आहे, की उद्या जेंव्हा तुम्हाला मर्यादांचा सामना करावा लागेल, तेव्हा त्या हाताळण्यासाठी तुम्ही परिपक्व मार्गांचा वापर कराल. परंतु बहुतांश लोक मर्यादा निर्माण करतात. ते “सोलमेट-जीवनसाथी” यासारखे शब्द वापरतात किंवा असा दावा करतात की त्यांचे नाते “स्वर्गात” जोडले गेले आहे. या पातळीची स्वतःची फसवणूक असण्याच्या वाटेत भ्रमनिरास होणे अटळ आहे.

लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळवल्या जात नाहीत!

विवाह व्यवस्थेत काही चुकीचे आहे का? अजिबात नाही! जोपर्यंत आपल्याला हे माहिती असते की हा अनुभव अदभूत नाही, तोपर्यंत विवाह हा एक अतिशय सुंदर अनुभव असू शकतो. आपण जर प्रेमाच्या अनेक भ्रामक समजुती बाळगत बसलो, तर आपण सर्वात सुंदर व्यक्तीसोबत विवाह केला तरीही, तो अपयशी ठरेल कारण तुम्ही स्वतःची निरंतर फसवणूक करून घेऊ शकत नाही. तुम्हाला जर शहाणपणाचे आणि आनंदी जीवन जगायचे असेल, तर हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे, की विवाह ही काही स्वर्गीय देण नाही, ती एक मानवी व्यवस्था आहे.

प्रेम ही काही तुम्ही करण्याजोगी गोष्ट नाही, प्रेम ही तुमची असण्याची रीत आहे.

हे खरे आहे की काही विशिष्ठ कर्म बंधनांमुळे दोन व्यक्ती एकमेकांकडे आकर्षित होऊ शकतात. परंतु त्याचा अर्थ असा नाही, की ते एक आदर्श नाते ठरेल. या नात्यांची  सफलता यावर अवलंबून असते की आपण ती किती परिपक्वता आणि संवदेनशीलतेने हाताळतो.

माझा प्रेमाला विरोध नाही –अजिबातच नाही. प्रेम हा मानवी जीवनातील सर्वात सुंदर गुणांपैकी एक गुण आहे. अनेक संस्कृतींमध्ये प्रेम दडपले गेले आहे; इतर संस्कृतींमध्ये ते स्वर्गात निर्यात केले गेले आहे. पण प्रेम हे या ग्रहावरील आहे आणि ते अतिशय मानवी आहे. आपण ते का नाकारावे?

प्रेमाला कशाचीच गरज नाही. प्रेम हा केवळ एक गुण आहे. आपण प्रेम करत असणारी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या आपल्याजवळ उपस्थित नसली तरीही आपण तिच्यावर प्रेम करू शकता. आपण प्रेम करत असणारी व्यक्ती मरण पावली, तरीदेखील आपले तीच्यावरचे प्रेम कायम राहते. म्हणजेच आपण आपल्या भोवताली असणार्‍या व्यक्तींचा वापर या उपजत नैसर्गिक गुणाची अभिव्यक्ती करण्यासाठी उत्तेजक म्हणून करतो. तुम्ही तुमच्या पक्षपाती बुद्धित पुरेशी जागरूकता आणलीत, तर प्रेम हाच इथे जगण्याचा एकमेव मार्ग आहे. प्रेम ही काही तुम्ही करण्याजोगी गोष्ट नाही, प्रेम ही तुमची असण्याची रीत आहे.

प्रेम म्हणजे जीवनाची स्वतःशीच एकरूप होण्याची उत्कंठा. ही उत्कंठा वास्तविक पाहता सर्वसमावेशक – अमर्याद, अनंत बनण्यासाठीची आहे. केवळ प्रेम जेंव्हा सर्वसमावेशक होते, तेंव्हाच आपण अनंताला स्पर्श करतो. आणि तेंव्हाच तुम्हाला एका सहज साध्या गोष्टीचा साक्षात्कार होतो की आत्म्याला जोडीराची गरज नाही नाही. आणि ती कधीच नव्हती.

Editor's Note: Sadhguru shares the keys to forming lasting and joyful relationships, whether they are with husband or wife, family and friends, with colleagues at work or with the very existence itself in this ebook, "Compulsiveness to Consciousness."

Download Compulsiveness to Consciousness

This article was first published in Speaking Tree.