ईशा क्रियेच्या सूचना (या सर्व सूचना ऑडियोमध्ये उपलब्ध आहेत)

तयारी:

मांडी घालून, पाठीचा कणा आरामात पण ताठ ठेवून बसा. गरज पडल्यास पाठीसाठी आधार वापरा, पण डोक्यासाठी नको. ही क्रिया पूर्व दिशेला तोंड करून केल्यास अधिक फायदेशीर आहे. हात मांडीवर तळवे वरच्या दिशेला करून बसा. चेहेरा किंचित वर करून, डोळे बंद ठेवून, दोन्ही भुवयांच्या मधे हलकं लक्ष असू द्या.

हे ध्यान तीन टप्प्यात होतं.

पहिला टप्पा:

हळू आणि आरमात श्वास आत-बाहेर करा. दर वेळेस श्वास आत घेताना, मनात स्वतःला सांगा, ‘मी शरीर नाही.’ हा विचार, श्वास पूर्ण आत घेईपर्यंत टिकला पाहिजे. दर वेळेस श्वास बाहेर सोडताना, मनात स्वतःला सांगा, ‘मी मनही नाही.’ हा विचार, श्वास पूर्ण बाहेर सोडेपर्यंत टिकला पाहिजे. सात ते आकरा मिनिटांसाठी असं करत रहा.

दुसरा टप्पा:

‘आ’ या मंत्राचा सात वेळेस उच्चार करा, तोंड पूर्ण उघडून, आणि दर वेळेस त्यात पूर्ण श्वास बाहेर सोडून. हा नाद, नाभीच्या किंचित खालून यायला हवा. फार मोठ्ठ्यानं म्हणायची गरज नाही, पण तुम्हाला आवाजाची कंपनं किंवा vibrations जाणवतील इतक्या मोठ्ठ्यानं म्हणा. 

तिसरा टप्पा:

चेहेरा किंचित वर उचलून, दोन्ही भुवयांच्या मधे हलकं लक्ष केंद्रित करून, पाच ते सहा मिनिटांसाठी स्वस्थ बसून रहा.

या पूर्ण क्रियेला बारा ते आठरा मिनिटं लागतात. त्या नंतर तुम्हाला जास्त वेळ शांत बसून राहायचं असेल तर हरकत नाही. लक्षात घ्या की ईशा क्रियेला बसल्यावर मनाच्या किंवा शरीराच्या कृतींकडे लक्ष देऊ नका. जे काही शरीरात किंवा मनात घडत असेल, त्याकडे दुर्लक्ष करा आणि सहज स्वस्थ बसून रहा. क्रियेच्या मधे उठू नका कारण त्यानं क्रियेमुळे होत असलेल्या उर्जेच्या सुसंघटनात खंड पडतो. हि क्रिया तुम्ही किमान १२ मिनिट केल्यानं सर्वांत जास्त लाभ होईल. ही क्रिया दिवसांतून दोनदा, सतत अठ्ठेचाळीस दिवसांसाठी करा. याला एक मंडल किंवा चक्र मानतात. किंवा नव्वद दिवसांसाठी दिवसातून एकदा करा. ही क्रिया कुणीही करून, त्यातून लाभ घेऊ शकतं. तुम्हाला केवळ सोप्या सूचना, त्यांत काही बदल न करता पाळायच्या आहेत. ही एक अगदी सोपी पण अतिशय शक्तिशाली क्रिया आहे. तुम्ही दिवसभरातून आठवेल तेव्हा स्वतःला आठवण करून देऊ शकता की मी शरीर नाही, मी मनही नाही. क्रिया करताना video मधल्या सद्गुरूंच्या आवाजाचा आधार घेतल्यास उत्तम. पण तुम्ही या आधाराशिवाय, ही क्रिया करू शकता.

ईशा क्रिया रोज केल्यानं आरोग्य, उत्साह, समृद्धी आणि सर्वांगीण कल्याण साधता येतं. आधुनिक जगाच्या धकाधकीच्या जीवनात समतोल साधण्यासाठी आणि आयुष्य त्याच्या सर्वोच्च क्षमातांपर्यंत अनुभवण्यासाठी हे एक शक्तिशाली साधन आहे.