लोक हिंसक का होतात, यावर उपाय काय?

बातम्यांच्या चक्रव्यूहात हिंसाचाराच्या घटना अहोरात्र दाखवल्या जात असताना, संघर्षमय जीवन जगणे हेच मानवाच्या नशीबी आहे का, असे वाटत राहते. हिंसाचाराचे हे चक्र एकदाच कायमस्वरूपी थांबवण्यासाठी काय उपाय आहे? सद्गुरु मार्ग दाखवतात.
लोक हिंसक का होतात, यावर उपाय काय?
 

प्रश्नकर्ता: समाजातील हिंसाचार थांबवण्यासाठी काय उपाय आहे असे तुम्हाला वाटते?

सद्गुरु: काही वर्षांपूर्वी जेंव्हा मी कॅलिफोर्नियात होतो, तेंव्हा मी एका गाडीच्या बंपरवर एक स्टिकर पाहिला, त्यावर लिहिले होते, “आमचे राज्यपाल तुमच्या राज्यपालांना मारु शकतात”. आपली संस्कृती कोणत्या दिशेने वाटचाल करते आहे हेच यातून दिसून येते. आजच्या चित्रपटांमध्ये कोणीतरी कोणावरतरी सतत गोळ्या झाडताना दाखवतात. बहुतांश व्हिडिओ गेम्समधे एकमेकांवर गोळीबार करायला भाग पाडले जाते. खेळण्यांच्या दुकानांत अर्धी अधिक खेळणी म्हणजे बंदुकाच असतात. आपण युद्धे आणि स्मार्ट बॉम्बची वर्णने ऐकतो जे खिडकीतून आत शिरून कोणाला तरी ठार करू शकतात. जगातील जवळजवळ प्रत्येक गोष्ट आज हिंसक बनत चालली आहे. आपले संगीत, आपले नृत्य, आपली संस्कृती, आपण आपल्या आयुष्यात करत असलेली प्रत्येक गोष्ट हिंसक बनत चालली आहे. एखाद्या वेळी आपण तिला रस्त्यावर सामोरे गेलो तर त्यात आश्चर्य वाटायला नको.  

...कारण हिंसा मानवाच्या मनात आहे. त्या हिंसेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

एक व्यक्ती म्हणून स्वतःकडे लक्षपूर्वक पहा आणि दिवसातून किती क्षण तुम्ही तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला सहन करू शकत नाही? हे आठवून पहा. संयम ठेवणे फक्त काही काळच उपयोगी पडेल. काही घटना घडल्यानंतर; त्या संतापाचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही कारण हिंसा मानवाच्या मनात आहे. त्या हिंसेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपण जर माणसांच्या मनातील आग विझवू शकलो नाही, तर आपण रस्त्यांवर लागलेल्या आगी विझवू शकत नाही. आज किंवा उद्या ती पुन्हा पेटेलच.

एक मनुष्य म्हणजे अफाट ऊर्जा आणि प्रचंड क्षमता आहे हे आपण समजावून घेणे आवश्यक आहे. त्याच्यातील उर्जेला जर योग्य अशी अभिव्यक्ती मिळाली नाही आणि त्यांना योग्य प्रकारे दिशा निर्देशित केली नाही, तर तो हिंसक कृत्यांकडे वळणार हे नक्की. बाहेर पडून तुम्ही कोणालातरी ठार करणे म्हणजेच हिंसाचार नाही. तुम्ही संतापले आहात, तुम्ही चिडलेले आहात, तुम्ही शांत, स्थिरपणे बसू शकत नाही – ही सुद्धा हिंसा आहे. तुम्ही जर तिला तिच्या मूळापासून दूर केले नाही, तर तुम्हाला शांती लाभणार नाही. योगाचे विज्ञान हेच तर आहे: तुमच्या उर्जेला योग्य दिशा दाखवायला आणि निर्देशित करायला शिकणे, ज्यामुळे तुम्हाला तुम्ही कोण आहात याची सर्वोच्च अभिव्यक्ती सापडेल. ज्याला तुम्ही जीवन असे म्हणता अशा या उर्जेला तुम्ही तिची योग्य अशी अभिव्यक्ती शोधू दिली नाही, तर साहजिकच ती हिंसक मार्गांनी तिचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करते.

योगाचे विज्ञान हेच तर आहे: तुमच्या उर्जेला योग्य दिशा दाखवायला आणि निर्देशित करायला शिकणे, ज्यामुळे तुम्हाला तुम्ही कोण आहात याची सर्वोच्च अभिव्यक्ती सापडेल.

जोपर्यंत वैयक्तिक परिवर्तनाच्या दिशेने कार्य करणार्‍या चळवळी होत नाहीत, तोपर्यंत शांतता मिळणार नाही. हे काही लोकांच्या जमावाला रस्त्यांवर एकत्र करून करता येण्यासारखे नाही. त्यासाठी वैयक्तिक परिवर्तनासाठी वचनबद्धतेचा दृष्टीकोण असणे आवश्यक आहे. घोषणा आणि वक्तव्ये करून जगाला शांतता लाभणार नाही, तर मानवी समाजाच्या सर्व स्तरांवर शांततापूर्ण मानव निर्माण करण्याचा आजीवन प्रयत्न करण्यामुळे तसे होणार आहे. असे काही शक्य आहे का? जगाच्या आजच्या परिस्थितीनुसार भविष्याचा विचार करू नका. पृथ्वीवरची वास्तविकता क्षणार्धात बदलून टाकता येतात, कारण आजच्या परिस्थिती लोकांच्या इच्छा, आकांक्षा, वचनबद्धता आणि लोकांच्या हृदयात काय धडकतं आहे याचा विचार करत नाहीत. आपण जर त्यांच्या आंतरिक आकांक्षांना चालना देऊ शकलो, प्रत्येक मनुष्याच्या हृदयात काय धडकतं आहे ते जर आपण बाहेर काढू शकलो, तर शांतता प्रस्थापित करण्याची पुरेपूर शक्यता नक्कीच आहे. हे घडवून आणण्यासाठी जर आपण स्वतःला झोकून दिले तर आपल्या हयातीत या पृथ्वीवर काहीतरी जबरदस्त घडून आलेले आपण पाहू शकू.