कृष्णाची बुद्धिमत्ता आणि खोडकर स्वभावाची झलक दाखवणार्‍या महाभारतातील अनेक कथांमधील या कथेत अशा एका प्रसंगाचे वर्णन केले आहे जेंव्हा कुरुक्षेत्राच्या युद्धपूर्वी शक्तीशाली  सैन्याची जमवाजमव करत असताना दुर्योधन आणि अर्जुन या दोघांकडून कृष्णासमोर  मैत्रीचा प्रस्ताव ठेवण्यात  आला. दुर्योधनाला जरी त्याचा मूर्खपणा लगेच लक्षात आला नाही, तरी त्याची  वृत्ती आणि त्याने केलेली निवड यामुळे त्याला मोठी किंमत चुकती करावी लागली.

सद्गुरू: महाभारतात घडलेला हा एक सुंदर प्रसंग किंवा घटना आहे. कुरुक्षेत्रातील युद्ध अटळ होते आणि हे दोन पक्ष सैन्याची जुळवाजुळव करत होते. त्या वेळी फक्त दोनच पक्ष होते. कौरव आणि पांडव. ते शक्य तितका पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत होते कारण युद्ध लवकरच सुरू होणार होते आणि प्रत्येक सैनिक महत्वाचा होता. त्यांना अधिकाधिक सैन्य जमा करायचे होते कारण प्रश्न अखेर जीवन-मरणाचा होता, ती काही कोणती निवडणूक नव्हती. ते अनेक राज्यांमध्ये पाठिंबा मिळवण्यासाठी फिरत होते आणि दोघांनी त्यांच्यासोबत शक्तीशाली सैन्य जमा केले होते.

इंडोंनेशियामधे वायांग बेबरच्या महाभारतातील प्रसंग दाखवणार्‍या बाहुल्यांच्या खेळातील प्रसंग. उजवीकडून: द्रोण, दुर्योधन, कर्ण आणि दुश्यासन.

कृष्ण हा कोणी राजा नाही, पण त्याच्याकडे 10,000 पेक्षा अधिक प्रशिक्षित सैनिकांची सेना आहे, ज्यांनी अनेक युद्धांमध्ये भाग घेतलेला असतो – एक मौल्यवान संपत्ती. तर कृष्ण दुपारी झोपेचे नाटक करत असतो. तो तसाच आहे – तो झोपेचे नाटक करतो आहे कारण जेंव्हा पुढे काय घडणार आहे हे तुम्हाला माहिती असते, आणि तरीही तुम्हाला त्या खेळाच्या रंगाचा भंग करायचा नसतो, तेंव्हा थोड्याफार प्रमाणात सोंग करणे आवश्यक असते. तर तो झोपी गेल्याचे नाटक करत असतो, आणि त्याच्या बिछान्यावर पहुडलेला असतो. दुर्योधन, सर्वात मोठा कौरव तिथे आला, त्याचा खोलीत डोकावून पाहिले आणि त्याला दिसले की कृष्ण झोपलेला आहे. वाट पाहण्याचे ठरवून तो तिथे कृष्णाच्या पायाखाली बसतो. झोपलेल्या कृष्णाच्या चेहेर्‍यावर सौम्य हास्य असते. त्याचे पाय दुर्योधनाच्या दिशेने असतात. दुर्योधन त्याकडे पाहतो आणि त्याला ते आवडत नाही. “हा राजा देखील नाही, हा एक गुराखी आहे. मी एक महान सम्राट आहे. मी याच्या पायांशी का बसलो आहे?” म्हणून तो सावकाशपणे उठून उभा राहतो आणि त्याच्या डोक्याजवळ येऊन बसतो. नंतर अर्जुन येतो. तो कृष्णाचा भक्त असतो, आणि अगोदर दुर्योधन बसलेला असतो त्याठिकाणी तो जाऊन बसतो. कृष्णाचे पाय त्याच्या दिशेने असतात, तो त्याकडे एक आशीर्वाद म्हणून पाहतो. म्हणून तो तिथेच बसतो. थोड्या वेळाने कृष्ण डोळे उघडतो, आणि जागे झाल्याचे नाटक करतो. हे पहा, ही एक अडचण आहे. एकदा तुम्ही झोपेचे नाटक केले की तुम्हाला जागे झाल्याचे पण नाटक करावे लागते. एक कृती पुढील अनेक गहन कृतींकडे घेऊन जाते.

तर त्याने जागे झाल्याचे नाटक केले, त्याचे डोळे उघडले, आणि तो म्हणाला, “अरे अर्जुना, तू आला आहेस तर.” अर्जुन म्हणाला, “हो भगवान, मी आलो आहे.” पुढे ते काही बोलायच्या आतच दुर्योधनाने त्याची उपस्थिती जाणवून देण्यासाठी त्याचा घसा खाकरला. कृष्ण म्हणाला, “अरे, दुर्योधना, तु सुद्धा? दोघेही एकाच वेळी – तुम्ही दोघे इथे कशासाठी आला आहात? त्याला सगळी परिस्थिती माहिती होती.

मग दोघेजण म्हणाले की ते युद्धात त्याची मदत मागायला आले आहेत. कृष्ण म्हणाला “तुम्ही दोघे आला आहात आणि तुम्ही दोघेही एकच गोष्ट मागत आहात, त्यामुळे माझे म्हणणे असे आहे. तुमच्या दोघांपैकी एकजण माझे सैन्य घेऊन शकतो, आणि मी दुसर्‍याकडे जाईन. पण मी युद्ध करणार नाही. मी फक्त तुमच्यासोबत येईन. माझे लक्ष अगोदर अर्जुनाकडे गेल्यामुळे, त्याला निवडीची संधी प्रथम मिळेल.” दुर्योधनाने विरोध केला, “मी इथे आधी आलो आहे!” कृष्ण म्हणतो, “पण मी काय करू शकतो? मी पहिल्यांदा त्याला पहिले आहे.”

मग कृष्ण अर्जुनाला म्हणाला, “तू तुला जे हवं त्याची निवड कर.” अर्जुन म्हणाला, “भगवान, आम्हाला तुम्ही हवे आहात, मला तुमचे सैन्य मिळाले नाही तरी चालेल. आम्हाला केवळ तुम्ही आमच्यासोबत हवे आहात.” कृष्णाने त्याला सूचना दिली, “मी तुझ्यासाठी युद्ध करणार नाही. मी फक्त तुझ्यासोबत येणार आहे.” तो म्हणाला, “तुम्हाला काहीही करावे लागणार नाही, आम्हाला फक्त तुम्ही आमच्या बाजूने हवे आहात.” मग दुर्योधनाने सुटकेचा निश्वास टाकला – तो अतिशय आनंदी झाला! त्याला माहिती होते की पांडव मूर्ख आहेत, पण 10,000 प्रशिक्षित सैनिकांच्या ऐवजी ते एका माणसाला निवडण्यायेवढे ते येवढे मूर्ख असतील असा विचार त्याने कधीही केला नव्हता. आणि हा एक माणूस युद्ध देखील करणार नाही. फक्त तुमच्यासोबत येणार आहे, तुमचे सारथ्य करणार आहे. 10,000 प्रशिक्षित सैनिकांच्या ऐवजी एक माणूस, जो युद्ध सुद्धा करणार नाही – किती मूर्खासारखी निवड आहे. पण त्या निवडीनेमुळेच युद्धाच्या निकालावर मोठा फरक पडला.