प्रश्न: नमस्कार. क्रियेचा सराव करताना नेहमीच मनात येणाऱ्या विचारांचे आव्हान असते. त्यांना लांब ठेवण्याचा व क्रियेवर लक्ष केंद्रित करण्याचा मी खूप प्रयत्न करतोय, पण खरंतर ते जमत नाहीये. ध्यान अथवा क्रिया करताना विचारांवर नियंत्रण कसे ठेवावे?

सद्‌गुरु: तुम्ही खूप प्रयत्न करून विचारांना काढून टाकण्याचा प्रयत्न करताय, पण ते काही जात नाहीयेत. हा मनाचा स्वभाव आहे, पण असं दिसतंय की तुमचा मनाविरुद्ध खूपच पूर्वग्रह आहे. जेव्हा तुम्ही क्रिया अथवा ध्यान करता, तेव्हा तुमची तुमच्या किडनी किंवा फुफुसं काम करण्याला किंवा हृदय धडधडण्याला काही हरकत नसते. शरीरातल्या इतर प्रक्रियांविषयी तुमची काही हरकत नाही - फक्त तुमच्या मेंदू ने कार्य करायला नको! तुम्ही काही अध्यात्मिक करत असला म्हणजे तुमच्या मेंदूने काम करणे थांबवावे ही कल्पनाच चुकीची आहे.

तुमचे विचार हे फक्त गंध आहेत - एकतर सुगंध किंवा दुर्गंध - तुमच्या आत तुम्ही जे काही बाळगून आहात त्यातून निर्माण होणारे. नवं काहीच निर्माण होत नाहीये. तुम्ही जे काही गोळा केलं आहे ते जर तुम्ही तुमच्या मेंदूत जाऊ दिलं नाही, तर तुमचा मेंदू अपूर्व पद्धतीने काम करेल. तुमच्या कल्पने पलीकडच्या अचाट गोष्टी तो करू शकतो. पण आत्ता तो तुमच्या स्वतःच्या कचऱ्याने भरलाय – हीच अडचण आहे; म्हणूनच तुम्हाला त्याला थांबवायचं आहे. मेंदू तुमच्या आयुष्याचा मुकुट असण्याऐवजी तुमच्या आयुष्यातली एक कचरापेटी झाला आहे. शाररीकदृष्ट्या, तो मुकुट आहे. योगिक प्रतीकानुसार, सहस्रार हे एक हजार पाकळ्यांचे कमळ आहे . ‘एक हजार’ म्हणजे शब्दशः ती संख्या नाही, पण काहीतरी अगणित या अर्थाने. तुमचा मेंदू अस्तित्वाच्या प्रक्रियेत घट्ट रोवलेला असता तर अगणित शक्यता खुल्या झाल्या असत्या. पण आत्ता, तुमचा मेंदू फक्त मानसिक प्रक्रियेत रोवलेला आहे.

आता तुम्ही असं म्हणाल, “सद्गुरू, मी अगदी तेच म्हणतोय – विचार कसे नियंत्रित करू?” नाही, तुम्हाला असं म्हणायचं नाहीये. तुम्हाला आत्मज्ञानाच्या तुमच्या भ्रामक कल्पनेत विचारांनी हस्तक्षेप करू नये असं वाटतं. भ्रामक, कारण आत्मज्ञान ही अशी गोष्ट नाहीये जी तुम्ही घडवून आणता. तुम्ही प्रकाश घडवत नाही, पण तुम्ही प्रकाश बघता. सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तुम्ही प्रकाश घडवत नाही, पण तुमचे डोळे उघडे असतील तर तुम्हाला प्रकाश बघता येतो. जर तुम्ही प्रकाश निर्माण केला, समजा एखाद्या टॉर्चने किंवा आणखी कशानेतरी, तर तुम्हाला तो सतत चालू ठेण्यासाठी काहीतरी करावं लागतं, आणि एक दिवस संपून जाईल याची सतत भीती असते.

शिक्षण आणि आत्मज्ञानातला फरक हा एवढाच आहे - तुम्ही १,१० किंवा १००० पुस्तकं वाचून शिकू शकता, पण कधी न कधीतरी पुस्तके संपून जातील. आत्मज्ञान म्हणजे तुम्ही स्वतःला पुस्तकातून शकविले नाही - तुम्ही अगदी सहज अस्तित्वाबरोबर जोडलेले आहात; ही एक निरंतर प्रक्रिया आहे. असं काही आहे का जे तुम्हाला माहित नसतं पण एका आत्मज्ञानी व्यक्तीला माहित असतं? नाही. अशी काही आहे का जे एका आत्मज्ञानी व्यक्तीला माहित नसतं? नाही. मी शाब्दिक खेळ करत नाहीये. अस्तित्वाची प्रकृतीच अशी आहे.

एक अकार्यक्षम मन

तुम्ही तुमच्या मनात जे विचार निर्माण करतात त्याहून तुमच्या लिव्हर किंवा किडनीत जे घडतंय ते अधिक गुंतागुंतीचं आहे. जर तुमच्या अवयवांच्या हालचालीने तुम्ही त्रस्त होत नसाल, तर मग तुमच्या विचारांनी तुम्ही का त्रस्त होता? कारण तुम्हाला वाटतं की तुम्ही म्हणजे तुमचे विचार आहात. जेव्हा तुम्ही विचार करता, तेव्हा तुम्ही त्याकडे “माझे विचार ” म्हणून बघत नाहीत, तुम्ही म्हणता “मी असा विचार करतो”. तुम्ही तुमची ओळख तुमच्या विचारांशी अगदी घट्ट बांधलेली असल्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. जोपर्यंत तुम्हाला किडनीची समस्या नसते, तोपर्यंत तुमची ओळख तुमच्या किडनीशी बांधलेली नसते. जर त्यांनी नीट काम केलं, तर बहुतेक लोकांना याची जाणीवही नसते की त्यांना किडनी आहे की नाही. किडन्या एक उपकरण आहेत - त्या इतक्या सुरळीतपणे काम करत आहेत की आपण त्यांना विसरु शकतो.

जे व्यवस्थित काम करत नाही त्याविषयी तुम्ही नेहमीच अधिक जागरूक असता. बरं का, मी तुमच्या मेंदूबद्दल बोलतोय. जर तो सुरळीतपणे काम करत असता, तर तुमचं तुमच्या मेंदूकडे लक्ष गेलं नसतं; जसं तुमचं किडनी किंवा लिव्हरकडे लक्ष नसतं. जर तुमची ओळख त्याच्याशी बांधलेली नसेल, तर तुमचं लक्ष जाणार नाही. जर तुमची ओळख त्याच्याशी बांधलेली असेल, तर ती एक मोठ्ठी गोष्ट होऊन जाते. तुम्ही म्हणजे तुमचे विचार नाही. जे तुम्ही मुळात नाही, अश्या गोष्टीशी तुम्ही तुमची ओळख बांधली आहे. एकदा का, जे तुम्ही नाही, अशा गोष्टीशी तुमची ओळख बांधली गेली, की तुम्ही मानसिक प्रक्रियेला थांबवू शकत नाही - ती अखंडपणे चालूच राहील. हे असं आहे, की जर तुम्ही खराब अन्न खाल्लं असेल, तर गॅस होणारच. तुम्ही त्याला बळजबरीने थांबवू शकत नाही. तुम्ही फक्त खराब अन्न खाणं थांबवलं पाहिजे.

आत्ता सध्या तुमच्यासाठी खराब अन्न म्हणजे हेच की - ज्या गोष्टी तुम्ही नाहीत, त्या तुम्ही आहात असं मानून चालणे. ज्याक्षणी तुम्ही तुमची ओळख तुमचं शरीर, तुमचे विचार, तुमच्या भावना, आणि तुमच्या आजूबाजूच्या इतर अनेक गोष्टींशी बांधता, विचारप्रक्रिया अखंड चालू राहील. लोकांना वाटतं मन हे असंच असतं. मन हे असं नसतं , किंवा असं म्हणा की, ते असं असणं अपेक्षित नाहीये. तुमचं रोज पोट दुखलं , तर तुम्हाला वाटेल की पोट हे असंच असतं.

मानवी शक्यता

मेंदू हा इतर अवयवांपेक्षा बराच जास्त संवेदनशील अवयव आहे. इतर प्रत्येक अवयवांचं एक विशिष्ट काम आहे , पण मेंदूची काही विशिष्ट कामं आहेत आणि त्याच्या बाकीच्या क्षमतांने काय करावं ते निश्चित करून दिलेले नाही. मनुष्य असण्याची हीच खरी समस्या आहे. इतर प्रत्येक प्राण्याचं विशिष्ट उद्दिष्ट आहे, त्याहून आणखी काही नाही. त्यांनी नीट खायला हवं, नीट वाढायला हवं, नीट प्रजनन करायला हवं, आणि एक दिवस मरावं – सर्वकाही निश्चित करून दिलेलं आहे. फक्त मनुष्यच गोंधळलेला आहे, “मी इथे का आहे? माझ्या जीवनाची प्रकृती काय आहे? मी कुठून आलो? मी कुठे जाणर?” हे सगळे प्रश्न फक्त तुम्ही मनुष्य असल्यावरच उद्भवतात. एक मनुष्य आणि इतर जीवांमधला फरक हा आहे की मनुष्यात सेरेब्रल कॉर्टेक्स आणि मेंदूचे इतर भाग बहरले आहेत.

तुमच्या आत उदयाला आलेल्या एका नवीन शक्यतेविषयी तुम्ही तक्रार करत आहात, एक शक्यता जी एक वानर, एक माकड किंवा अन्य कुठल्या जीवाकडे नाहीये. एका शक्यतेला एका समस्येसारखं हाताळू नका. ही समस्या नाहीये - ही एक मोठी संभावना आहे की तुम्ही इथे बसू शकता आणि १००० मैल लांब असलेल्या, १००० वर्षांपूर्वीच्या , १००० वर्षांनंतरच्या किंवा अजून कुठल्या गोष्टीविषयी विचार करू शकता. अनेक लोकांसाठी ही एक समस्या बनली आहे कारण त्यांनी कधी याच्या ‘युजर्स मॅन्युअल’कडे सुद्धा बघितलेलं नाही .

सर्वप्रथम मेंदूला खराब अन्न देणं बंद करा - त्याला सत्य भरवा, असत्य नव्हे. आपण सत्याच्या हातात आहोत. सत्य आपल्या हातात नाहीये. आपल्या हातात असत्यांचा एक गुंतागुंतीचं गाठोडं आहे. त्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही मानल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही निर्माण केल्या आहेत ,त्या जर तुम्ही बाजूला ठेवल्या, तर तुम्ही बघाल, जर तुम्ही इथे बसलात, तर तुमचं मन पूर्णपणे रिकामं राहू शकतं. जर ते रिकामं असेल तर काय उपयोग? उपयोग हा की मग ते संपूर्ण विश्व प्रतिबिंबित करू शकतं. अन्यथा ते अगदीच हास्यास्पद बनतं. हीच निवड आहे - तुम्ही तुमच्या मनाला एक हास्यास्पद जागा बनवू शकता किंवा एक वैश्विक जागा बनवू शकता. ती एक वैश्विक जागा बनण्यासाठी तुम्ही सगळी असत्य टाकून दिली पाहिजेत - मग ‘सत्या’ची स्वाभाविकपणे भरभराट होईल. असत्याचा अभाव हेच सत्य होय.

सत्य काय आहे आहे याविषयी फक्त एक मूर्ख बोलेल. जो खरंच जाणतो, तो फक्त त्याच्या अवतीभोवती बोलेल, कारण तुम्ही त्याविषयी बोलू शकत नाही. तुम्ही फक्त त्याचीच व्याख्या आणि वर्णन करू शकता ज्यात कुठलातरी पदार्थ आहे, ज्याचे मोजण्याजोगे मापदंड किंवा सीमारेखा आहेत. एखाद्या गोष्टीला जर सीमारेखा किंवा मापदंड नसतील तर तुम्ही त्याविषयी बोलू शकत नाही. सगळा प्रयत्न हा तुम्ही जमा केलेला गोंधळ दूर करण्याविषयी आहे, सत्याला प्रस्थापित करण्याविषयी नाही. सत्याला प्रस्थापित करण्याची गरज नाहीये. सत्याच्या मांडीवरच आपल्या सगळ्यांचं अस्तित्व टिकून आहे.

मी तुम्हाला क्रिया करताना कुठले विचार येतात हे विचारणार नाही. तुमच्या विचारांची चिंता करू नका. त्याहून महत्वाचं म्हणजे, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या किडनीचं काम जसं होतंय तसं त्यांना पण चालू द्या. तुमच्या किडनीमध्ये सगळं काही स्वच्छ नाही. तुमच्या मेंदूत सुद्धा सगळं काही स्वच्छ नाही – त्यात तुम्हाला अडचण का असावी?

चांगले विचार आणि वाईट विचार

चांगल्या आणि वाईट विचारांत भेदभाव करू नका. चांगले विचार किंवा वाईट विचार असं काही नसतं - फक्त विचार असतात. तुमचे विचार तुमच्याजवळ कोणत्या प्रकारचा कचरा आहे यावर अवलंबून आहेत - त्या प्रकारचा गंध त्यातून निर्माण होईल. आजचा गंध कालच्या कचऱ्यावर अवलंबून आहे. तुम्ही कचरापेटीत काय टाकलं त्यावर ते अवलंबून आहे. काल जर तुम्ही चित्रपट बघितला असेल किंवा अजून काही घडलं असेल, तर आज ते तुमच्याकडे पुन्हा परत येईल. तुमच्या विचारांविषयी मत बनवू नका - तो फक्त कचरा आहे. पहिली गोष्ट म्हणजे, ते खरे देखील नाहीत. विचार, याचा अर्थ ते वास्तव नाही. आत्ता सध्या तुम्ही जे काही आहात त्याचा बहुतांश भाग हा अजागरुक आहे. तुम्ही सतत तुमच्या आत स्वतःच्या अश्या गोष्टी निर्माण करत आहात.. तुम्हाला जर निर्मिती आणि निर्माता यांची प्रकृती जाणायची असेल तर हे महत्त्वाचं आहे की तुम्ही स्वतःच्या अश्या गोष्टी निर्माण करत नाही आहात; पण नेमकं हेच तुम्ही आत्ता करण्याचा प्रयत्न करताय. स्वतः गोष्टी निर्माण करणं ही एक अगदीच तुच्छ पद्धत आहे.

क्रिया करताना जर तुम्ही विचारांचा एक सलग प्रवाह चालू ठेवण्याचा प्रयत्न केलात, तर अचानक ते येणं बंद होईल. अचानक तुमचं डोकं सुन्न होईल. तुमच्या विचारांची किंवा विचारांवर नियंत्रण कसे ठेवावे याची चिंता करू नका. आज तुमच्या आत जे आहे त्यानुसार विचारांचा प्रवाह चालू राहील. याचं काहीच महत्त्व किंवा निष्पत्ती नाही. तुम्ही फक्त क्रिया करणं आहे – विचारांबाबत काही करू नका. तुम्ही त्यांना काढून टाकण्याचा प्रयत्न करताय की सतत विचार करण्याचा प्रयत्न करताय की १०८ पवित्र विचार आणण्याचा प्रयत्न करताय, तरीही तुम्ही मुळात विचारांची प्रक्रिया नियंत्रित करायचाच प्रयत्न करताय. किडन्या त्यांचं काम करतील, लिव्हर त्याचं काम करेल, मेंदू त्याचं काम करेल; तुम्ही क्रिया करा - बस एवढंच.