प्रश्न : सद्गुरु, तुम्ही म्हणाला होता की तुम्ही तुमची बाह्यजगतातील कार्य कमी कराल आणि आश्रमात तुमचे आध्यात्मिक कार्य अधिक तीव्र कराल. याबद्दल अधिक सांगू शकता का?

सद्गुरू : आम्ही हे तसंही वेगवेगळ्या मार्गांनी करतंच आहोत. मी बाह्यजगतातील कार्य कमी केलेले नाही; मला मान्य करावे लागेल की ते केवळ वाढतच चालले आहे. पण असे बरेच लोक आहेत ज्यांना मला थोडे-थोडे, पायरी पायरीने, वर न्यायचे आहे. यापैकी बहुतेक गोष्टींकडे भौतिकदृष्ट्या लक्ष देण्याची गरज नसते; ते त्या शिवाय केले जाऊ शकते. बरेचशे ब्रह्मचारी अत्यंत सखोल साधनेत आहेत. त्याचं फळ प्रकट होण्यास थोडा वेळ लागेल, परंतु त्यांची साधनेची अत्यंत तीव्र प्रक्रिया चालू आहे. जेव्हा त्यापैकी बरेच जण स्वत:ला त्या प्रकारच्या साधनेत स्थापित करतात, तेव्हा आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पुरेसे स्थिर असणार्‍या आणि आश्रमात दीर्घकाळ राहणाऱ्या लोकांसाठी काहीतरी अधिक करू शकतो.

मोठ्या संख्येत लोकांसाठी हे करण्याच्या दृष्टीनं आम्ही काही प्रयत्न केले आहेत जसे आम्ही २०१० मध्ये अमेरिकेच्या नव्वद दिवसांचा 'अनादि' कार्यक्रम केला. आम्ही तिथे जे काही केले ते खूप महत्वाचे आहे. अशा गोष्टी क्वचितच घडतात, विशेषतः लोकांच्या मोठ्या गटासाठी. त्यातील काही लोकांना खूपच चांगली प्रगती केली, पण आजच्या जगातील सर्वांत मोठी समस्या म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दल लोक दर दोन दिवसांनी त्यांचे विचार बदलत राहतात. दीर्घ काळासाठी काहीतरी करत राहण्याची समज अनेकांत नाही. आदि शंकराचार्य म्हणाले, “निश्चलतत्वं जीवन मुक्तिः.” म्हणजे कोणत्याही गोष्टीकडे अविचल लक्ष दिल्यास परम मुक्ती साध्य होईल. कुठलीही गोष्ट! फक्त देवच नाही, फक्त स्वर्ग नाही - कुठलीही गोष्ट! तुम्ही फक्त अविचल प्रकारे फुलांकडे पहा - ते होईल. तुम्ही अविचल प्रकारे मुंगीकडे पहा - ते होऊन जाईल. काहीही घ्या, पण अविचलतेने, निश्चलतेने. तुम्हाला प्रेमळ असण्याचीही गरज नाही, तुम्ही तुमचा राग जरी अविचल पद्धतीनं धरून ठेवलात, तरी तुम्हाला साक्षात्कार होईल. सुखद गोष्ट असो की अप्रिय - त्याने काही फरक पडत नाही - जर तुमचे लक्ष अविचल असेल तर तुमच्या आत गोष्टी आपोआप घडू लागतील. आज लोक लक्ष स्थिर ठेवण्याच्या कमतरतेलाच एक विशेष पात्रता समजून बसले आहेत.

जर तुम्ही ग्रहणशील राहण्याचा प्रयत्न केला असेल तर, जर तुम्ही तुमच्या मीपणापासून स्वत:ला मुक्त केले असेल, तर मी तुमचे प्रयत्न वाया जाऊ देणार नाही, त्यामुळे त्याबद्दल चिंता करू नका.

त्या नव्वद दिवसात 'अनादि'त काय घडले, त्यांना काय दिले गेले, ते त्यातून कसे गेले, साधनेच्या कोणत्या स्तरावर पोचले आणि त्यापैकी बरीचसे जण आता त्यांच्यासाठी काम करणाऱ्या गोष्टींबद्दलही कसे रोज त्यांचे विचार बदलत आहेत, या सगळ्याची मला मोठी गंमत वाटते. जर कुठली गोष्ट काम करत नसेल तर त्याबद्दल विचारही करू नका, सोडून द्या ते. पण जर तुमच्यासाठी एखादी गोष्टी अगदी प्रभावीपणे काम करत असेल आणि तुम्ही तुमचे विचार बदलत राहिलात, तर तुम्हाला किती हळू आणि हफ्त्या हफ्त्याने या दिशेला वाटचाल करायची आहे, हे तुम्हाला ठरवावे लागेल. तुम्हाला छोटी छोटी पावले घ्यायची आहेत का खरंच मोठे पाऊल उचलायचे आहे ते तुम्हाला ठरवावे लागेल. पाश्चात्य समाजात आपले मत सतत बदलणे ही मोठी कौतुकाची गोष्ट मानली जाते, कोणत्याही गोष्टीबद्दल वचनबद्धता दर्शवू नका आणि स्वत:ला मुक्त समजा.

भारतात शहरी लोकसंख्याही काही मागे नाही; ते फार लवकर हे सारं अनुसरीत आहेत. ते देखील त्याच प्रकारच्या अवस्थेत आहेत. जरी त्यांच्यासाठी काहीतरी चांगले झाले असले , तरीही ते त्याबरोबर स्थिर राहू शकत नाहीत. म्हणून, जेव्हा तुम्ही बदलत्या परिस्थितीमध्ये असता तेव्हा आम्ही तुम्हाला जास्त त्रास होईल असे काही करू नये, कारण ते त्याप्रकारे काम करणार नाही. जर तुम्हाला फक्त एक अगदी साधा सराव शिकवायचा असेल, जो जिवंत नाही, तर तो मी तुम्हाला एका कागदावर लिहून देऊ शकतो. पण जर जिवंत असं काहीतरी प्रक्षेपित करायचं असेल, तर जीवनऊर्जा खर्ची पडते. म्हणून तुम्ही जे वाया घालवत आहात ते केवळ तुमचे जीवन नाही, तुम्ही माझी जीवन ऊर्जा वाया घालावत आहात. मी ते सहजपणे सहन करत नाही. जिथे काहीही उगवणार नाही अशा ठिकाणी का पेरायचे? दगडावर मौल्यवान बी का पेरायचे? मला सुपीक जमिनीत एक बी पेरायला आवडेल. त्यासाठी तुम्ही मला दोष देऊ शकत नाही. जर मला सुपीक माती दिसली तर मी सगळंकाही उधळून देईन. पण दगडावर, त्याचा काही उपयोग नाही.

म्हणूनच आम्ही टप्प्याटप्प्याने जात आहोत, त्यानुसार कोण कुठे आहे हे पाहत पाहत. तुम्ही आश्रमात असाल किंवा नसाल आणि मी तुम्हाला पाहिले असो किंवा नसो, तुम्ही कोण आहात याची काळजी करू नका. जरी मला तुमचे नाव माहीत नसेल, आणि जर तुम्ही तुमची साधना करत असाल आणि तुमची संस्थाप्रणाली तयार करत असाल तर वेळ येईल तेव्हा मी त्यात सहभागी होईन. मला याबद्दल तुमच्याशी शब्दशः बोलण्याची आवश्यकता नाही. तुम्ही फक्त तुमची शरीरप्रणाली तयार करा; उर्वरित बाकी सारे मी करीन.

जर तुम्ही ग्रहणशील राहण्याचा प्रयत्न केला असेल तर, जर तुम्ही तुमच्या मीपणापासून स्वत:ला मुक्त केले असेल, तर मी तुमचे प्रयत्न वाया जाऊ देणार नाही, त्यामुळे त्याबद्दल चिंता करू नका. तुमच्यात इतर कोणताही दोष नाही, फक्त तुम्ही तुमच्या सीमांमध्ये गुंतवणूक केली आहे. फक्त तुमचे शरीर आणि मनाचे चोचले पुरवत त्याला मोठे करू नका. बाकी मी बघून घेईन. आणि हे वचन मी मागे घेऊ शकत नाही.

सप्रेम आशीर्वाद,