प्रश्न: असे म्हंटले जाते की आदि शंकरांनी एका राजाच्या शरीरात प्रवेश केला आणि त्यांचे वास्तव्य त्या शरीरात दीर्घकाळापर्यन्त होते. प्रत्यक्षात हे शक्य आहे का? आणि असेल, तर कसे? हे साध्य होण्यासाठी योगावर कोणत्या प्रकारे प्रभुत्व असावे लागते? 

सद्गुरु: एकदा आदि शंकराचार्यांचा एका व्यक्तीशी वाद झाला आणि त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर त्या व्यक्तीची पत्नी त्या वादविवादात सहभागी झाली. वादाच्या बाबतीत स्त्रियांचं वर्चस्व तुम्हाला माहिती असेलच! आदि शंकर हे एका विशिष्ट सिद्धीप्राप्त योगी होते – त्या प्रकारच्या व्यक्तींसोबत वाद घालणे शहाणपणाचे नाही. परंतु तिने मात्र वाद घालायचाच असे ठरवले. ती म्हणाली, “आपण माझ्या पतीला हरविलेत, पण ते माझ्यावीण ते अपूर्ण आहेत. आम्ही दोन शरीर एक जीव आहोत. म्हणून तुम्ही माझ्यासोबत सुद्धा वादविवाद चर्चा केलीच पाहिजे.”  आपण या तर्कावर कशी मात करू शकाल? आणि मग त्या स्त्रीसोबत त्यांचा वाद सुरू झाला. त्यानंतर जेंव्हा तिच्या लक्षात आले की तिचा पराभव होणार आहे तेंव्हा तिने त्यांना मानवी लैंगिकतेविषयी प्रश्न विचारायला सुरुवात केली. आदी शंकरांनी त्यांना जे बोलायचे होते ते बोलले. त्यानंतर त्या विषयात ती अधिक तपशिलात शिरली आणि तिने विचारले, “आपल्याला याविषयावर अनुभवाने काय माहिती आहे? शंकर तर ब्रम्हचारी होते. त्यांचा पराभव करण्यासाठी वापरलेली ही एक युक्ती आहे हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून मग त्यांनी उत्तर दिले, “मला एका महिन्याची मुदत हवी आहे. आपण जिथे थांबलो तिथून पुढे परत आपला वाद एका महिन्यानंतर सुरू करू.”

त्यानंतर ते गुहेत गेले आणि त्यांनी त्यांच्या शिष्यांना संगितले, “या गुहेत कोणत्याही परिस्थितीत कोणालाही प्रवेश करू देऊ नका कारण काही काळासाठी मी माझ्या शरीराचा त्याग करून इतर शक्यतांचा शोध घेणार आहे.”

आपल्या जीवन ऊर्जा किंवा ज्याला आपण प्राण म्हणतो, तो पाच आयामांमधून प्रकट होत असतो: प्राण वायु, समान, अपाण, उधाण आणि व्याण. प्राणाच्या या पाच प्रकटीकरणांची पाच महत्वाची कार्ये आहेत. प्राण वायु हा श्वसन क्रिया, विचार प्रक्रिया आणि स्पर्शाची जाणीव हाताळतो. एखादी व्यक्ती जीवंत आहे का मृत आहे हे आपण कसे तपासून पाहतो? तिचा श्वास जर थांबलेला असेल, तर आपण म्हणतो ती मरण पावली आहे. श्वास थांबलेला असतो कारण प्राण वायू बाहेर निघून जाण्यास सुरुवात झालेली असते. प्राण वायू संपूर्णपणे शरीरातून निघून जाण्यासाठी एक ते दीड तास एवढा वेळ लागतो.

म्हणूनच परंपरागत असे ठरवलेले होते की एखाद्या व्यक्तीचा श्वास थांबल्यावर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याआधी किमान एक ते दीड तास थांबावे – कारण ती व्यक्ती इतर अनेक पातळींवर जीवंत असते. आपण एक ते दीड तास थांबतो कारण त्या व्यक्तीची विचार प्रक्रिया, तिची श्वसन क्रिया आणि तिच्या संवेदना निघून जाव्यात, ज्यामुळे तिला दहनाची जाणीव होऊ नये. आता उर्वरित इतर प्रकारचे प्राण मात्र अजूनही शरीरातच असतात. व्याण प्राण जो प्राणाचा शेवटचा आयाम आहे, तो बारा ते चौदा दिवसांपर्यंत टिकून राहू शकतो. प्रामुख्याने, शरीरातील व्यान प्राणाच्या कार्यामुळे शरीराचे जतन करणे आणि त्याची एकात्मता राखून ठेवणे शक्य होते. म्हणून जेंव्हा शंकरांनी त्यांचे शरीर त्यागले, तेंव्हा त्यांनी त्यांचा व्याण प्राण त्यांच्या शरीराताच ठेवला ज्यामुळे त्यांच्या शरीराचे जतन होऊ शकेल.

आणि मग असे घडले, की राजाला नागाने दंश केला होता आणि तो मरण पावला होता. जेंव्हा नागाचे विष आपल्या शरीरात शिरते, तेंव्हा आपले रक्त साकळून श्वास घेणे अवघड होऊ लागते, कारण जेंव्हा रक्त संचारात अडथळे येतात, तेंव्हा श्वसन करणे अवघड होते. आपला प्राण वायु बाहेर पडण्या अगोदर आपला श्वास थांबतो. ज्या व्यक्तीला त्या शरीरात प्रवेश करायचं असेल, तिच्यासाठी ही एक उत्तम संधी असते. सहसा आपल्याकडे त्यासाठी एक ते दीड तासाचा वेळ उपलब्ध असतो. पण जेंव्हा  तुमच्या शरीरात नागाचे विष पसरलेले असते, तेंव्हा तुमच्याकडे चार ते साडेचार तासांचा अवधी असतो.

तर आदी शंकरांना ही संधी प्राप्त झाली आणि त्यांनी अतिशय सहजगत्या राजाच्या शरीरात प्रवेश केला. आणि त्यांनी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पार पाडल्या ज्यामुळे ते त्या प्रश्नांची उत्तरे अनुभवातून देऊ शकतील. राजाच्या निकटची काही हुशार माणसे होती, ज्यांनी पाहिले की ज्या व्यक्तीला आपण मृत असे जाहीर केले आहे तो अचानकपणे जिवंत होऊन उठून बसला आहे, आणि त्याच्या वर्तणूकीवरुन त्यांच्या असे लक्षात आले की ही तीच व्यक्ती नसून तिच्या शरीरात दुसर्‍या एखाद्या व्यक्तीने प्रवेश केलेला आहे. म्हणून त्यांनी संपूर्ण शहरात सैनिक पाठवले, आणि त्यांना सूचना दिल्या की जर त्यांना एखादे मृत शरीर दिसले, तर त्याचे त्वरित दहन केले जावे – म्हणजे ते शरीर राजाच्या शरीरात प्रवेश केलेल्या व्यक्तीचे असेल, तर त्याला ते सोडून देऊन पुन्हा स्वतःच्या शरीरात प्रवेश करणे शक्य होणार नाही. कारण आता राजा जीवंत झालेला आहे – एक वेगळीच व्यक्ती, पण अगदी तशीच दिसणारी, पण त्याने काय फरक पडणार आहे? परंतु त्यांना तसे करण्यात यश मिळाले नाही आणि शंकर पुन्हा परतले. 

तर मग अशी गोष्ट घडणे शक्य आहे का? हो, तसे घडणे अगदी शक्य आहे. ही एक फार मोठी गोष्ट आहे का? खरे म्हणजे ही काही फार मोठी गोष्ट नाही. त्यासाठी फक्त आपल्यातील जीवन यंत्रणा कशी कार्य करते याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पण, समजा आपल्याला एखाद्या जीवंत व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करायचा आहे, तर त्यासाठी मात्र खूप मोठ्या प्रयत्नांची आवश्यकता आहे. शरीराचा नुकताच त्याग केलेल्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करणे हे खूपच सोपे आहे. पहिल्या एक ते दीड तासाच्या कालावधीत तसे करणे उत्तम आहे कारण आवश्यक ती पोकळी निर्माण झालेली असते, आणि त्याच वेळेस जीवनाच्या इतर सर्व क्रिया सुरू असतात. याच कारणामुळे भारतात, जेंव्हा एखाद्या व्यक्तीचा श्वास मंदावतो होते, तेंव्हा त्या व्यक्तीला घरच्या थोडे बाहेर ठेवले जाते. ते धूप (एका प्रकारचा सुगंध) जाळून काही मंत्रघोष सुरू करतात. हे सोडून जाणार्‍या व्यक्तीचे सांत्वन करण्यासाठी, तसेच इतर कोणी त्या शरीरात प्रवेश करू नये म्हणून असे केले जाते. 

अशा गोष्टी घडू नयेत म्हणून अनेक प्रक्रिया आणि सुरक्षिततेचे उपाय निर्माण करण्यात आले होते. पण आज, असे घडणे एवढे दुर्मिळ झाले आहे की लोकं त्याला एक फार मोठी गोष्ट समजू लागली आहेत.

 

Editor’s Note: Watch this video, where Sadhguru speaks about the intellectual clarity and zest of Adi Shankara, and the fundamental culture of the nation which recognized that bowing down is the way to rise.