अध्यात्मिक प्रगतीसाठी ध्यान हे एक महत्वाचे साधन आहे आणि ती शरीराच्या आणि मनाच्या  मर्यादांपलीकडे घेवून जाणारी एक आवश्यक पद्धत आहे.अंतर्गत तंत्रविद्येच्या शिक्षकांनी आणि साधकांनी ध्यान आणि योग करण्याचे अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे अनुभवले आहेत. गेल्या काही वर्षात ध्यानाविषयी केल्या गेलेल्या अनेक वैज्ञानिक अभ्यास आणि संशोधनांनी या अनुभवांना पुष्टी मिळाली आहे.

Read in Hindi: शाम्भवी महामुद्रा

शांभवी महामुद्रा ही ईशाच्या ध्यान योग सरावाची पहिली पायरी आहे. या प्राचीन ध्यानक्रियेला वाहून घेतलेले लाखो साधक असे सांगतात की त्यांना उच्च प्रतीचे भावनिक संतुलन, एकाग्रता, स्थिरता आणि उत्तम तब्येतीचा अनुभव आला आहे.

खरे तर, नियमितपणे ‘क्रिया’ करण्याने होणारे वेगवेगळे फायदे विविध वैज्ञानिक संशोधनांद्वारे तपासण्यात आले आहेत. क्रिया करत असताना मेंदूत होणाऱ्या प्रक्रिया आणि त्यामुळे लोकांच्या तब्येतीवर आणि मनस्वास्थ्यावर होणाऱ्या परिणामांची आकडेवारी, अश्या दोन्ही प्रकारे ते फायदे मोजले गेले आहेत.

क्रिया करण्याने काय परिणाम होतो?

बरेचजण आनंदी किंवा निरोगी नसतात कारण त्यांचे शरीर मन आणि ऊर्जा एका पातळीत नसतात.

सद्गुरू म्हणतात “आपले शरीर, आपले मन तयार करण्यासाठी आपल्या व्यवस्थेची जी रचना करावी लागते, त्याचा एक ठराविक मार्ग आहे, आणि तो आपल्यामधेच आहे .. अगदी आपल्याला जसा हवा आहे तसा”. पारंपरिक पद्धतीने पाहता योग आपल्या शरीराचे ५ कोष असल्याचे सांगतो. अन्नमय कोष,मनोमय कोष,  प्राणमय कोष, विज्ञानमय कोष आणि आनंदमय कोष. बरेचजण आनंदी किंवा निरोगी नसतात कारण त्यांचे शरीर मन आणि ऊर्जा एका पातळीत नसते. सदगुरू म्हणतात, “जर ते सुसंगतपणे संतुलित आणि एका पातळीत असतील, तर मानवी शरीरात स्वाभाविकपणे आनंद ओथंबून वाहू लागेल. तर आता आपण अशा तंत्रज्ञानाबद्दल बोलतोय जे मनुष्याचे हे तीन पैलू, शरीर, मन आणि उर्जा सतत संतुलित आणि सुसंगत ठेवतं, जेणेकरून आनंदानुभव ही फक्त एक अपघाती गोष्ट न रहाता, तो एक सर्वसामान्य, नित्यनियमित गोष्ट बनते, म्हणजे जीवन जगण्याचा एक नैसर्गिक मार्ग."

शांभवी महामुद्रेविषयीचे परीक्षण

शांभवी महामुद्रा या विषयाचा अभ्यास अनेक स्वरुपात केला गेला आहे. काहींनी त्याचा आजाराची स्थिती आणि औषधाचा वापर यावर होणारा परिणाम तपासला आहे, काहींनी पाळीच्या समस्यांवर भर दिला आहे, तर इतरांनीझोप, हृदयाच्या ठोक्यांची अनियमितता, मेंदूतील प्रक्रिया इत्यादीला ध्यानामुळे होणारे फायदे अभ्यासले आहे.  तर काही इतर संशोधनात, नियमितपणे ध्यान करणाऱ्या लोकांचे एकूण स्वास्थ्य आणि वाढलेली एकाग्रता यांचा अभ्यास केला गेला आहे.

मुख्य अभ्यासातल्या काही निष्कर्षांचा आढावा घेवू या.

ध्यानाचे फायदे #१ हृदयाचे सुधारलेले स्वास्थ्य

शांभवी महामुद्रेमुळे हृदयाचे स्वास्थ्य कसे सुधारते याची तपासणी २००८ आणि २०१२ मध्ये प्रकाशित झालेल्या दोन शोध निबंधांमध्ये घेतली गेली आहे. त्यामधून असा निष्कर्ष निघाला आहे की ध्यानात सहभागी झालेल्यांची हृदय व्यवस्था अधिक संतुलित होती आणि त्यांच्या हृदयगती परिवर्तनशीलतेमध्ये वाढ झाली होती. हृदयगती परिवर्तनशीलता जास्त असेल तर ताणाच्या प्रसंगांचा सामना करण्याची हृदयाची शक्ती जास्त असते आणि त्यामुळे अश्या व्यक्तीची हृदयरोगातून वाचण्याची शक्यता वाढते.

तर दुसऱ्या बाजूला, हृदयगती परिवर्तनशीलता कमी असल्यास अनेक प्रकारचे हृदयरोग होवू शकतात, जसे की हृदयाच्या धमन्यांचे रोग, रक्तदाब, हृदय बंद पडणे, हृदयाच्या स्नायूंमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे. संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे की, शांभवी महामुद्रा आणि इतर इशा योगक्रिया करणाऱ्या लोकांची व्यायाम करण्याची क्षमता जास्त असते, त्यांचे हृदय ताणाचे प्रसंग नीट हाताळते आणि रक्तदाबामुळे होणाऱ्या त्रासांची, जसे की हृदयाला अपुरा रक्तपुरवठा होणे किंवा त्यात गुठळी होणे, याची शक्यता कमी असते.

ध्यानाचे फायदे #२ : मेंदुमधील सुसंवाद सुधारतो.

आय.आय.टी. दिल्लीमधल्या सेंटर फॉर बायोमेडिकल इंजिनीरिंग या संस्थेनी साधकांच्या मेंदूची- क्रिया करण्यापूर्वी, क्रिया करताना आणि क्रिया करून झाल्यावर–इ.इ.जी. (इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी) तंत्राचा वापर करून मिळवलेली माहिती तपासली.आणि त्यातून असा निष्कर्ष निघाला की साधकांच्या मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागाचा एकमेकांशी असलेला संवाद अधिक चांगल्या रीतीने होतो आहे. ‘इ.इ.जी. कोहीरनस्’ हे मेंदूतील वेगवेगळे घटक एकमेकांबरोबर कसे काम करतात ते मोजण्याचे एकक आहेत. जास्त कोहेरन्स म्हणजे मेंदूमधील वेगवेगळ्या घटकांमध्ये माहितीची देवघेव जास्त प्रमाणात होते आहे. आणि त्या घटकांची एकत्रितपणे काम करण्याची क्षमता वाढली असल्याचे समजून आले आहे. जास्त कोहीरनस् म्हणजेच जास्त बुध्यांक(आय. क़्यु), जास्त सृजनशीलता. जास्त कोहीरनस् म्हणजे उत्तम भावनिक संतुलन आणि उत्तम आकलन क्षमता.

संशोधकांनी इ.इ.जी. मधील अल्फा, बिटा, डेल्टा आणि थिटा या लहरींमधील  वेगवेगळे संदेश तपासले. शांभवी साधकांमध्ये अल्फा लहरींची ताकद जास्त आढळून आली. याचा अर्थ त्यांच्या ताणाची पातळी कमी असते. तसेच त्यांच्या डेल्टा आणि थिटा लहरीची ताकद वाढल्याचे आणि बिटा लहरींची ताकद लक्षणीयरीत्या कमी असल्याचे आढळले. कमी ताकदीच्या बीटा लहरी म्हणजे ताण, भीती, काळजी यांना आधीन होण्याची शक्यताकमी होणे. या पूर्वीच्या संशोधनामध्ये असे नोंदवले गेले आहे की जास्त ताकदीच्या डेल्टा आणि थिटा लहरी, जागरूकपणे गहन ध्यानावस्थेत प्रवेश करणे दर्शवतात. ठराविक लयीच्या डेल्टा लहरी आणि त्यात मिसळलेल्या अल्फा लहरी या इतरांची उर्जा सहजपणे जाणून घेण्याची शक्ती (एक प्रकारचा सिक्सथ् सेन्स) दर्शवतात, असेही संशोधकांनी नोंदवले आहे.

ध्यानाचे फायदे #३ झोप सुधारते.

लिस्बन, पोर्तुगाल येथे झालेल्या ‘युरोपियन स्लीप रिसर्च सोसायटी’च्या २० व्या अधिवेशनात एक शोध निबंध सदर करण्यात आला. यात १५ ध्यान करणाऱ्या पुरुषांच्या झोपेच्या आलेखाची तुलना, १५ ध्यान न करणाऱ्या लोकांच्या झोपेच्या आलेखाबरोबर केली गेली होती. दोन्ही गटातल्या लोकांचे शिक्षण आणि वय सारखेच होते आणि ते २५ ते ५५ या वयोगटातले होते. ध्यान करणारे लोक शांभवी महामुद्रा आणि इतर इशायोग करणारे होते.

संपूर्ण रात्रभर प्रयोगात भाग घेतलेल्यांची पॉलिसोम्नोग्राफिक मशीनतर्फे (झोपेविषयीची निरीक्षणे करणारे मशीन) निरीक्षणे नोंदवण्यात आली. तसेच इ.इ.जी.ची माहिती गोळा करण्यात आली. इतरही काही बाबींची नोंद घेण्यात आली. त्यावरून असे दिसून आले की गाढ झोप लागणे, सहज झोप लागणे आणि एकूण झोपेचा काळ या निकषांमध्ये ध्यान करणाऱ्या लोकांची टक्केवारी ध्यान न करणाऱ्या लोकांपेक्षा कितीतरी जास्त आढळून आली.

ध्यान करणाऱ्यांना झोप लागल्यानंतर कमी वेळा जाग आली आणि चांगली झोप लागली. या प्रयोगातून असा निष्कर्ष निघाला की सातत्याने शांभवी ध्यान केल्याने झोपेवर चांगला परिणाम होतो.

ध्यानाचेफायदे # ४ : लक्ष देणे आणि एकग्रता वाढते

परसेप्शन नावाच्या मासिकामध्ये एक शोध निबंध प्रकाशित झाला. त्यात ८९ लोकांची ईशा योग करण्यापूर्वी आणि ३ महिने ईशा योग केल्यानंतर, ‘स्ट्रॉप टास्क’ आणि ‘अटेन्शन ब्लिंक टास्क’ अश्या २ चाचण्यांमधील कामगिरीची निरीक्षणे नोंदवलीहोती. ‘स्ट्रॉप टास्क’ चाचणीमध्ये काम सांगताना गोंधळात टाकणाऱ्या सूचना दिल्यानंतर प्रतिसाद देण्याकरता लागलेला वेळ नोंदवला जातो. उदा. जेव्हा रंगाचे नाव वेगळ्या रंगामधे लिहिले जाते (‘लाल’ हा शब्द काळ्या रंगामधे लिहिणे) तेव्हा प्रतिसाद देणाऱ्याची अक्षरांचा रंग ओळखण्यात चूक होते. या प्रयोगात सहभागी झालेल्यांनी ध्यानाच्या सरावापूर्वी जेवढ्या चुका केल्या त्यापेक्षा कितीतरी कमी चुका सरावानंतर केल्या.

तसेच,‘अटेन्शन ब्लिंक टास्क’चाचणीमध्ये लोकांना अत्यंत कमी वेळाकरता दाखवलेली वेगवेगळी दृश चित्र ओळखायची असतात. ध्यान करण्यापूर्वी ज्यांनी ५८% बरोबर उत्तरे दिली होती त्यांनी ध्यानाचा सराव केल्यानंतर ६९% पर्यंत मजल मारली. यावरून संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की ध्यानामुळे लक्षपूर्वक काम करण्याची क्षमता वाढते.

युनिव्हर्सिटी ऑफ टूलूसच्या डिपार्टमेंट ऑफ सायकीअॅट्री आणि यू.सी.अर्वाइनच्या ह्यूमन बिहेवियर डिपार्टमेंट आणि इंडियाना युनिवर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन यांच्या एकत्रित गटाने ईशायोगाचा सराव केल्यानंतर लक्ष देण्याची क्षमता वाढते हे समजल्या नंतर लक्षपूर्वक कामे करण्यातली कुशलता, एकाग्रता टिकवण्याची क्षमता, अधिक क्षमतेची पुनर्-वाटणी, आकलनातील लवचिकता आणि स्वयंप्रेरणेने दिलेल्या प्रतिसादाला लागणारा वेळ यात कशी सुधारणा होते, याचा अभ्यास केला. या संशोधनातून असे दिसून आले की, बहुधा योग करणाऱ्या माणसाच्या (योग न करणाऱ्या माणसाच्या तुलनेत) प्रतिसाद देण्याच्या व्यवस्थेत झालेल्या रचनात्मक, शरीररचनात्मक आणि कार्यात्मक बदलांमुळे या सुधारणा झाल्या असाव्यात.

ध्यानाचे फायदे #५ : मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात.

असे म्हणतात की ७५% बायकांना मासिक पाळीविषयी तक्रारी असतात, ज्याचा त्यांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक बाबींवर प्रचंड परिणाम होतो. त्याकरता अस्तित्वात असलेले प्राथमिक उपचार समाधानकारक नाहीत, अगदी शस्त्रक्रिये सारखा टोकाचा उपाय निवडला तरी. अलीकडे बऱ्याचश्या विकारांवर जे पर्यायी उपचार केले जातात त्यात बहुतांशी लोकं योगाचा आधार घेणे जास्त पसंत करतात. अश्या आजारांच्या संदर्भात ध्यान आणि योगाचे फायदे बऱ्याच काळापासून अभ्यासिले जात आहेत आणि त्याचे निष्कर्ष आशादायी आहेत.

पूल हॉस्पिटल्स एन.एच.एस. ट्रस्ट, युके आणि इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन यांनी एकत्रिपणेएक सर्वेक्षण केले. ज्यात अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, मलेशिया आणि लेबनॉन

येथील शांभवी महामुद्रा करणाऱ्या १४ ते ५५ वयोगटातल्या १२८ स्त्रियांना प्रश्न विचारण्यात आले. त्यातील ७२% स्त्रिया रोज ध्यानाचा सराव करत होत्या आणि बाकीच्या आठवड्यातून १ ते ३ वेळा सराव करत होत्या.

क्रिया करण्याआधी आणि क्रिया करून निदान ६ महिने झाल्यानंतर, मासिक पाळीच्या वेगवेगळ्या तक्रारींचा प्रभाव आणि व्याप्तीया विषयी प्रश्न विचारण्यात आले. तक्रारींमध्ये मासिक पाळीच्या वेळी पोटात दुखणे, पाळी सुरु होणापुर्वीचे त्रास, जास्त रक्तस्त्राव, पाळीची अनियमितता, पाळीच्या तक्रारींकरता औषधांची अथवा शस्त्रक्रीयेची गरज, पाळीच्या काळात काम करण्यात येणारे अडथळे या प्रश्नांचा समावेश होता.

त्याचा निकाल असे सांगतो की मासिक पाळीच्या वेळी होणारी पोटदुखी ५७% नी कमी झाली. चिडचिड, भावनिक चढ-उतार, रडू फुटणे, नैराश्य, भांडणे  यासारखी मानसिक लक्षणे ७२%नी  कमी झाली. स्तनांची सूज आणि त्यांची अतिसंवेदनशीलता ४०%नी उतरली, पोट फुगणे आणि वजनात होणारी वाढ ५०%नी कमी झाली. अतिरक्तस्त्राव होण्याचे प्रमाण 87%ने कमी झाले. पाळीची अनियमितता ८०%नी कमी झाली. पाळीच्या तक्रारींकरता औषधांची अथवा शस्त्रक्रीयेची गरज ६३%नी कमी झाली. काम करण्यात येणारे अडथळे ८३%नी कमी झाले.

यावरून अभ्यासकांनी असा निष्कर्ष काढतात की ‘क्रिया’ प्रकारामुळे मुळे सर्व प्रकारची लक्षणे सुधारली गेल्याने ही पाळीच्या तक्रारींकरता पूरक उपचारपद्धती समजली जाऊ शकते.

ध्यानाचे इतर फायदे

शांभवी महामुद्रा केल्याने आयुष्य कसे सुधारले यावर प्रश्न विचारले असता ५३६ जणांनी औषधांचा वापर कमी झाल्याचे आणि उदासीनता, ऍलर्जी, दमा आणि इतर आजार निघून गेल्याचे सांगितले. ९१% लोकांनी मनःशांती वाढल्याचे सांगितले, ८७% लोकांचे भावनिक संतुलन वाढल्याचे सांगितले.

८०% लोकांनी विचारांची स्पष्टता वाढल्याचे सांगितले. ७९% लोकांनी अंगातली ताकद वाढल्याचे सांगितले. ७४% लोकांनी आत्मविश्वास वाढल्याचे सांगितले. ७०% लोकांनी एकाग्रता आणि काम करण्याची क्षमता वाढल्याचे सांगितले.

उदासीनतेचा आजार असणाऱ्या लोकांनी ध्यान करायला लागल्यावर ८७% लोकांनी सुधारणा झाल्याची नोंद केली. २५% लोकांनी त्यांचा औषधांचा वापर कमी झाल्याचे सांगितले, तर ५०% लोकांनी त्यांचे औषध बंद केल्याचे सांगितले. तसेच ज्यांना चिंता सतावते आहे अशांपैकी ८६% लोकांनी सुधारणा झाल्याचे सांगितले, 28% लोकांनी त्यांचा औषधांचा वापर कमी झाल्याचे सांगितले तर ३०% लोकांनी त्यांचे औषध घेणे बंद केल्याचे सांगितले.  निद्रानाशाचा विकार असणाऱ्यांपैकी ७३% लोकांनी सुधारणा झाल्याचे, ४०% लोकांनी औषधांचा वापर कमीझाल्याचे आणि ३०% लोकांनी औषध घेणे बंद केल्याचे सांगितले.

ज्यांना सर्दी आणि फ्ल्यूचा त्रास होत होता, त्यांनी देखील सुधारणा झाल्याचे सांगितले. डोकेदुखी, दमा, फायब्रोमायाल्जिया, पोटाच्या तक्रारी, मधुमेह, रक्तदाब, ह्रदयरोग आणि इतर प्रदीर्घ आजार यांनी त्रस्त असणाऱ्या लोकांमध्येदेखील सुधारणा आढळून आली.

थोडक्यात

हे सगळे निष्कर्ष पाहता शांभवी महामुद्रा केल्याने ताण आणि काळजी यामध्ये घट झालेली दिसून येते, मनाची एकाग्रता आणि जागरूकता वाढलेली दिसून येते आणि स्वतःविषयी जागरुकता वाढलेली दिसून येते. तसेच नियमित सराव केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते, रक्तदाब, नैराश्य, पाळीच्या तक्रारी आणि इतर बऱ्याच विकारांकरता औषधांची गरज कमी तरी होते किंवा रहातच नाही, असे स्पष्ट होते.

करून पहा!

आनंदाची गोष्ट अशी आहे की, शांभवी महामुद्रा करायला रोजची फक्त २१ मिनिटे पुरेशी आहेत. ही क्रिया ‘इनर इंजिनीरिंग प्रोग्रॅम’चा, जो ईशाचा मुख्य कोर्स आहे, त्याचा एक भाग आहे. या प्रोग्रॅमचा बराचसा भाग तुम्ही घरी ऑनलाईन करू शकता. शिवाय जगभर शांभवीची दीक्षा नियमितपणे दिली जाते.

दुसरा एक पर्याय म्हणजे ईशा क्रिया सदगुरु मार्गदर्शित ध्यान. ईशा क्रिया एक शक्तिशाली १२-१८ मिनिटांची साधना आहे जी ऑनलाईनवर मोफत मार्गदर्शित ध्यान आहे. ज्यांना ध्यानाच्या आनंदाची चव चाखायची आहे त्याच्यासाठी ही एक उत्तम सुरुवात होऊ शकते. कार्यन पहा ह्या वेबसाईटवर IshaKriya.com

Editor's Note: Find out more about Inner Engineering, including upcoming program dates and venues.