नाते संबंधांमधे चिंतेचा पगडा का दिसून येतो या प्रश्नाचे उतर देत, अशा परिस्थिती आपण कशा हाताळू शकतो हे सांगत आहेत.

प्रश्नकर्ता: मला जेवढ्या म्हणून चिंता आहेत, त्या बहुतेक माझ्या नातेसंबंधांबाबतीत आहेत. इतरांकडून थोडीफार समजूतदारपणाची अपेक्षा करणं वाजवी नाही का?

सद्गुरू: जगात वावरताना तुम्ही पाहता विविध प्रकारच्या क्लिष्ट देवाण-घेवाणी घडत असतात.  जस जसं तुमचं कार्यक्षेत्र वाढत जातं, त्यानुसार व्यवहाराची क्लिष्टता सुद्धा वाढत जाते.  तुम्ही ऑफसच्या एका क्यूबिकलमध्ये कॉम्पुटरवर काम करत केवळ एका सहकाऱ्यासोबत सल्लामसलत करत असाल तर तुम्हाला थोडीशी समज असेल तर पुरेसे आहे. पण तुमच्या हाताखाली हजारेक माणसं काम करत असतील तर मग तुम्ही खूप समजूतदार असणं अगदी गरजेचे आहे.  समजा तुमच्या हाताखाली हजारेक माणसं काम करत आहेत आणि यातल्या प्रत्येकानं तुम्हाला समजून घेतलं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही काहीच हाताळू शकणार नाही.  या उलट, या एक हजार लोकांच्या क्षमता आणि मर्यादा समजून घेतल्या की तर मग तुमच्या परीनं जे शक्य आहे ते करू शकता.  आणि अशानेच परिस्थितीला हवं तसं वळण देण्याचं सामर्थ्य तुम्हाला लाभेल. जर या एक हजार माणसांनी तुम्हाला समजून घेऊन वागावं असं तुम्हाला वाटत असेल तर ते तुमचं दिवास्वप्न ठरेल. असं होणं कधीही शक्य नाही.
 

प्रश्नकर्ता: समजा, एखाद्या व्यक्तीशी माझं जवळचं नातं आहे आणि ती व्यक्ती मला खूप महत्त्वाची आहे. तर त्यांच्याकडून जरा चांगल्या समजुतीची अपेक्षा करणं ठीक नाही का?

सद्गुरू: हाच तर मुद्दा आहे. नातं जितकं जवळचं; त्यांना समजून घ्यायचा तितका तुम्ही जास्त प्रयत्न केला पाहिजे. एकदा असं झालं - एक माणूस कित्येक महिने सारखा कोमात जात असे आणि त्याची पत्नी दिवसरात्र त्याच्या पलंगापाशी बसून असायची.  एकदा त्याला काही वेळ शुद्ध आलेली असताना त्यानं आपल्या पत्नीला खुणावून जवळ यायला सांगितलं. ती जवळ बसल्यावर तो म्हणाला, “एक विचार माझ्या मनात सतत डोकावत आहे, माझ्या आयुष्यातल्या सर्व वाईट परिस्थितींमधे तू माझ्या सोबत राहिलीस.  मला नोकरीवरून काढून टाकलं गेलं तेव्हा तू मला आधार दिलास. जेव्हा माझा धंदा बुडाला तेव्हा तू ओव्हरटाईम आणि रात्रपाळी करून मला सावरलंस.  गोळी लागून जखमी होतो तेव्हा सुद्धा तू माझ्या सोबत होतीस. कोर्ट कचेरीतल्या भांडणात आपलं घर गमावून बसलो तेव्हाही तू सोबत होतीस. आता माझी तब्येत बिघडत चाललीये तरीही तू माझ्या सोबत आहेस. हे सगळं बघून मला तर असं वाटतंय “माझ्या आयुष्यात दुःखाचे डोंगर तुझ्यामुळेच येत आहेत “

नातं जितकं जवळचं; त्यांना समजून घ्यायचा तितका तुम्ही जास्त प्रयत्न केला पाहिजे..

नेमके असेच तुम्ही स्वत:शी अन् तुमच्या संबंधांमधे वागत आहात. एखादी व्यक्ती तुम्हाला जवळची आणि जिवलग होते जितकं तुम्ही त्यांना अधिकाधिक चांगल्या प्रकारे समजायला लागता.  जर ते तुम्हाला समजू लागतील तर त्यानां तुमचा सहवास आवडेल.  जर तुम्ही त्यांना समजू लागलात तर तुम्हाला त्यांची जवळीक आवडेल.

प्रश्नकर्ता: हे असं बोलणं फार सोपं आहे. प्रत्येक परिस्थितीत त्या व्यक्ती सोबत असणे अवघड आहे.....

सद्गुरू: दुसरी व्यक्ती अगदीच समजशून्य आहे असं नसतं. तुम्हाला जेवढी समज आहे त्यानुसार तुम्ही अशा परिस्थिती निर्माण करू शकता की जेणेकरून ती व्यक्ती तुम्हाला चांगलं समजू शकेल.  जर प्रत्येकवेळी दुसऱ्यानं तुम्हाला समजून घेऊन तुमच्या इच्छेनुसार वागावं अशी अपेक्षा बाळगत आहात, पण त्या व्यक्तीच्या गरजा, क्षमता, संभावना आणि मर्यादा तुम्ही समजून घ्यायला तयार नाही, तर संबंधांमधे संघर्ष हा होणारच.  आणि तो हमखास होणार.

तुम्ही तुमची समज अशा पातळीवर नेली पाहिजे की इतरांच्या वेडसरपणा पलीकडेसुद्धा तुम्हाला पाहता आलं पाहिजे.

दुर्दैवाने जगात जवळच्या नात्यांमध्येच जास्त लढाया होतात जेवढ्या भारत-पाकिस्तान मधे झाल्या नाहीत.  या दोन देशांपेक्षा तुमच्या नाते संबंधांमधे तुम्ही जास्त लढाया लढल्या आहेत.  याचं कारण, तुमच्या समजुतीची सीमारेषा अन् त्यांच्या समजुतीची सीमारेषा या वेगवेगळ्या आहेत.  जर तुम्ही ही सीमारेषा (L.O.C.) ओलांडलीत तर त्यांचा पारा चढतो, जर त्यांनी ती ओलांडली की तुमचं फिरतं.  पण जर तुमची समज तुम्ही त्यांच्या समजुतीच्या पलीकडे नेली तर आपोआप त्यांची समज तुमच्या समजुतीत सामावली जाईल.  मग तुम्ही त्यांच्या क्षमता अन् मर्यादांना सहज सामावून घेऊ शकाल. प्रत्येक व्यक्तीत काही सकारात्मक अन् काही नकारात्मक गोष्टी असतातच आणि जर या दोन्ही गोष्टी तुम्ही तुमच्या समजुतीच्या कक्षेत सामावून घेतल्या कि त्या संबंधाला मग तुम्ही हवा तसा आकार देऊ शकता.  जर तो त्यांच्या समजुतीवर सोपवला तर गोष्टी योगायोगानेच घडतील. जर ते खूप उदार असतील तर तुमच्यासाठी चांगलं होईल, नाही तर संबंध कोलमडतील.

हे सर्व सांगण्या मागचा उद्देश्य म्हणजे: तुमच्या आयुष्यात जे काही घडतं ते तुम्ही ठरवावं असं वाटतं का तुम्हाला? मग ते जवळचे संबंध असोत, व्यावसायिक असोत, राजकीय असोत, जागतिक किंवा इतर कोणतेही संबंध असोत, आपल्या जीवनात काय घडतं हे तुम्ही स्वत: ठरवावं असं वाटतं का तुम्हाला? जर असं वाटत असेल तर सर्वकाही आणि सर्वांना तुमच्या समजुतीच्या कक्षेत सामावून घेतलं पाहिजे. तुम्ही तुमची समज अशा पातळीवर नेली पाहिजे की इतरांच्या वेडसरपणा पलीकडेसुद्धा तुम्हाला पाहता आलं पाहिजे. तुमच्या सभोवती अगदी अप्रतिम माणसं आहेत, पण अधूनमधून काही क्षणांसाठी ते जरा वेडगळपणे वागतात.  हे जर तुम्ही समजलं नाही तर तुम्ही त्यांना गमावून बसाल. पण जर समजलात, तर त्यांना कसं हाताळावं तुम्हाला कळेल.

आयुष्याची दिशा कधीच सरळ रेषेत जात नाही.  आयुष्याचा गाडा सतत चालत ठेवण्यासाठी अनेक कसरती कराव्या लागतात.  तुमचा समजूतदारपणा जर तुम्ही सोडला तर आयुष्य हाताळण्याची क्षमता हरवून बसाल. जवळचे संबंध असोत किंवा व्यवाहारिक व्यवस्थापन, दोन्ही क्षेत्रात समजूतदारपणा गरजेचा आहे. नाहीतर सफल  संबंधांचा वारसा तुम्हाला लाभणार नाही.

Editor’s Note: Excerpted from Mystic’s Musings. Not for the faint-hearted, this book deftly guides us with answers about reality that transcend our fears, angers, hopes, and struggles. Sadhguru keeps us teetering on the edge of logic and captivates us with his answers to questions relating to life, death, rebirth, suffering, karma, and the journey of the Self. Download the sample pdf or purchase the ebook.