भारतीय तरुणांमध्ये योग-विज्ञानाविषयी आवड नाही - याचं कारण काय?

विज्ञान शाखेचा एक कॉलेज विद्यार्थी सदगुरुंना विचारतोय, योगाचा आविष्कार जरी भारतात झाला असला तरी, भारतीय तरुणांमध्ये योग-विज्ञानाविषयी आवड का नाही. सदगुरू योगाचा खरा अर्थ समजावत, योग-विज्ञान कसं प्रत्येक मानवाला लागू आहे हे स्पष्ट करताहेत.
A group of Indian youth | Why Do Young Indians Resist Yogic Sciences?
 

प्रश्न: नमस्कार सद्गुरू. मी विज्ञानशाखेचा विद्यार्थी आहे आणि जेव्हा पण मी कॉलेजमध्ये योग आणि शांभवी महामुद्रेविषयी बोलतो, तेव्हा लोक माझ्याकडे काहीसं तुच्छतेने पाहून म्हणतात, "तू सायन्स शिकतोयस ना? मग अशा गोष्टी कशा बोलतोस?"

कॉलेजच्या पहिल्या वर्षी मला हे सगळं ऐकून वाईट वाटायचं, नंतर मी दुर्लक्ष करायला लागलो. आता मला प्रश्न पडलाय की भारतीय तरुणांमध्ये आपल्या या विज्ञानाविषयी एवढी अनिच्छा का आहे? म्हणजे भारतीय शास्त्रे ही जीवनाच्या सखोल समजूतून सिद्ध झाली आहेत. असं असतानाही एवढा विरोध का? आणि या विरोधाला स्वीकारात बदलायची गरज आहे, किंवा किमान लोकांनी हे विज्ञान त्याच्या सार्थ रूपात एक्स्प्लोअर केल्याशिवाय त्याची अवहेलना करता कामा नये. आणि तसं करायचं असेल तर आपल्याला हे आंतरिक विज्ञान सध्याच्या शिक्षण पद्धतीत कशा प्रकारे आणता येईल?

सदगुरू: दुर्दैवाने आज आपण विज्ञान किंवा वैज्ञानिक या शब्दाची फारच संकुचित धारणा करून घेतलीये. मुळात, एखाद्या गोष्टीला तेव्हाच विज्ञान म्हणता येतं जेव्हा त्यात एक पद्धतशीरपणा असतो आणि त्याचा पुन:प्रत्यय येऊ शकतो. अगदी मूलभूत विज्ञान म्हणजे भौतिकशास्त्र, पण इतर अनेक शास्त्रे यातनंच विकसित झाली: जीवशास्त्र, मानसशास्त्र, सामाजिक शास्त्रे. तर ज्यात एक पद्धतशीर अभ्यास असतो आणि जे एका व्यक्तीला नव्हे तर जास्तीत जास्त लोकांना लागू होते त्याला विज्ञान किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हटलं जातं. 

 

या अर्थाने योगविज्ञानासारखं जास्तीत जास्त लोकांना लागू होणारं दुसरं शास्त्र नाही. इतकंच झालंय की लोकांनी ज्या योगाविषयी ऐकलंय तो अमेरिका रिटर्न योग आहे. त्यांना वाटतं योग म्हणजे विशिष्ट प्रकारच्या पँट्स घालून फिरणं. जणू काही एखादी फॅशनच असावी. नाही, योगाचा शब्दशः अर्थ "ऐक्य". ऐक्य म्हणजे काय? खुद्द तुमचं शरीर, एक दिवस कुणीतरी त्याला पुरणार आहे किंवा जाळणार आहे. धूर उठवत किंवा बिनधुराचे - कसंही असो, तुम्ही मातीतच मिसळणार ना?

आत्ता सुद्धा तुम्ही या मातीतनं आलेल्या एखाद्या रोपट्यासारखेच आहात. तुम्ही तुमची समज गमावली आहे कारण तुम्हाला चालण्याफिरण्याची क्षमता मिळाली. तुम्हाला वाटलं की तुम्ही स्वतःच एक विश्व आहात. झडासारखे तुमचे पाय देखील मातीत रोवलेले असते तर मला खात्री आहे की तुम्हाला कळलं असतं की तुम्ही या मातीचाच भाग आहात. पहा, पृथ्वीनं तुम्हाला चालण्याफिरण्याचं स्वातंत्र्य काय दिलं नि तुम्ही किती मूर्खासारखे वागू लागलात! हे तुमच्या शरीरालाच लागू आहे असं नाही तर संपूर्ण विश्व आणि तुमच्यातल्या प्रत्येक पैलूला लागू आहे.

योगविज्ञानासारखं जास्तीत जास्त लोकांना लागू होणारं दुसरं शास्त्र नाही.

तर योग म्हणजे ऐक्य आणि ऐक्याचा अर्थ असा आहे की हे आपल्या व्यक्तित्वाच्या सीमा कशा पुसून टाकायच्या याचं विज्ञान आहे, जेणेकरून तुम्ही आत्ता जेवढे आहात त्यापेक्षा खूप विशाल जीवन बनाल. एक तर तुम्ही इथे एक आक्रसलेलं, संकुचित जीवन म्हणून जगू शकता किंवा चैतन्याने सळसळणारं जीवन म्हणून जगू शकता. पहा एखाद्याला बद्धकोष्ठ झाला असेल तर गोष्टी थोड्या थोड्या करून होतात. सध्या बहुतेक लोकांचं जीवन असंच थोडं थोडं करून घडतंय. त्यांना जर विचारलं की तुमच्या आयुष्यातले अगदी मस्त वाटलेले प्रसंग कोणते तर ते म्हणतील, "मी परीक्षा पास झालो/झाले तेव्हा मला मस्त वाटलं." , "मी उदास होतो/होते, मला जॉब मिळाला मला छान वाटलं, पण नंतर सगळ्यांनी मला दुःखी केलं. नंतर माझं लग्न झालं, ही खूपच आनंदी घटना होती, पण मग माझ्या सासूबाई आल्या आणि फूस्स!" असं चालू राहतं. आपल्या आयुष्यात असे फक्त पाच प्रसंग ते मोजतील. जर तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण जीवनाच्या उल्लासाचा महापूर नसेल तर ते बद्धकोष्ठ झालेलं जीवन आहे.

तुम्हाला जर उल्हासाने भरलेलं जीवन जगायचं असेल तर व्यक्तित्वाच्या सीमा थोड्या तरी पुसल्या गेल्याच पाहिजेत. तरच तुम्ही जीवनाचा विशाल हिस्सा आत्मसात करू शकता, अनुभवू शकता, आणि आपल्या आजूबाजूला दिसतो त्यापेक्षा कितीतरी जास्त उल्हास बाळगू शकता. तुम्ही लहान असताना साबणाचे बुडबुडे काढून उडवलेत का?

होय.

सदगुरू: समजा तुम्ही फक्त इतकाच मोठा बुडबुडा काढू शकला, पण दुसरा एखादा त्याहून फार मोठा बुडबुडा काढतो. का? तुमच्याकडे पण हवा भरलेलं फुप्फुस आहे, साबण आहे, पण एखाद्याचा बुडबुडा एवढा मोठ्ठा होतो. कारण तुम्हाला तुमच्या सीमा विस्तारायच्या असतील तर नुसती इच्छा असून भागत नाही तर त्या मर्यादित जागेत किती हवा तुम्ही भरू शकता हे महत्वाचंय. मगच तो बुडबुडा एवढा मोठा होतो.

त्याचप्रमाणे माझं शरीर आणि तुमचं शरीर वेगळं आहे. जोपर्यंत आपल्याला कुणी पुरत नाही तोवर आपल्याला कळत नाही की हे सगळं काही त्याच मातीतलं आहे. पण या क्षणी हे शंभर टक्के स्पष्ट आहे की हे माझं शरीर आहे आणि ते तुमचं, हे माझं मन आहे आणि ते तुमचं. दोघांची अदलाबदल होऊ शकत नाही. पण माझं जीवन आणि तुमचं जीवन अशी कुठलीच गोष्ट नाहीये. इथं फक्त जीवन आहे. तुम्ही किती जीवन आपल्या अनुभवाच्या कक्षेत आणता त्यानं तुमच्या जीवनाची व्याप्ती ठरते, तुम्ही किती माहिती गोळा करताय त्यानं नाही. असं घडायचं असेल तर तुम्हाला तुमच्या व्यक्तित्वाच्या भरभक्कम सीमांना ओलांडून जावंच लागेल. जेव्हा या सीमा नाहीशा होतात, तेव्हा आपण म्हणतो तुम्ही योगस्थ झालात. जी व्यक्ती हे ऐक्य अनुभवते तिला आपण योगी असं म्हणतो. एखादी व्यक्ती किती लांबची मजल मारू शकेल हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतं, पण किमान आपणच आपल्या व्यक्तित्वाच्या ज्या सीमा निर्माण केल्या आहेत त्यांना ओलांडून जायचा शास्त्रीय पद्धतीने आणि एकचित्ताने प्रयत्न केला पाहिजे.

योग माझं जीवन आहे, कारण माझं संपूर्ण आयुष्य माझ्या स्वतःमधल्या आणि इतरांमधल्या सीमांना सतत पुसत रहायला वाहिलेलं आहे.

तुमच्या सगळ्या मर्यादा तुम्हीच निर्माण केलेल्या आहेत, नाही का? आपणच सीमारेषा आखायची आणि आपणच नंतर दुःख करत बसायचं - हे काय आयुष्य आहे? समजा निसर्गानेच सीमा आखून दिली असेल आणि त्याचं दुःख तुम्हाला झालं तर समजू शकतो. पण स्वसंरक्षणाच्या प्रयत्नात तुम्ही स्वतःच भिंती बांधता आणि स्वतःची सीमा बनवून घेता. या स्वसंरक्षणाच्या भिंती स्वतःच्याच तुरुंगाच्या भिंती बनतील. तसं व्हायला नको असेल तर तुम्हाला योगाची गरज आहे. "मग मी हातपाय असे मुडपायला हवे का? डोक्यावर उभं रहायला हवं का?" नाही, योग म्हणजे शरीर वेगवेगळ्या प्रकारे वाकवणं नाही. तुम्ही कशाही प्रकारे योग करू शकता - तुम्ही श्वास घेताना, चालता बोलता, उठता झोपताना योग करू शकता. ही काही विशिष्ट कृती नाहीये, हा एक विशिष्ट आयाम आहे.

लोक मला विचारतात," सद्गुरू, तुम्ही किती तास योगासनं करता?" मी म्हणतो, "वीस सेकंद!". खरंच सांगतोय. मी फक्त वीस सेकंदांची साधना करतो. सकाळी उठल्यावर फक्त वीस सेकंद आणि मी तयार असतो. मग त्यानंतर मी योग करत नाही का दिवसभरात? नाही! योग माझं जीवन आहे, कारण माझं संपूर्ण आयुष्य स्वतःमधल्या आणि इतरांमधल्या सीमांना सतत पुसत रहायला वाहिलेलं आहे. हाच योग आहे. आपण आता इथं जे करतोय तोच योग आहे.

संपादकीय टीप: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा, UnplugWithSadhguru.org वर.

Youth and Truth Banner Image
 
 
 
  0 Comments
 
 
Login / to join the conversation1