सद्गुरु: भारतात जवळपास 160 दशलक्ष हेक्टर शेतीयोग्य जमीन आहे. परंतु या जमिनीपैकी जवळजवळ साठ टक्के जमीन नापीक अवस्थेत पोचली आहे. याचा अर्थ असा की आणखीन पंचवीस ते तीस वर्षांच्या कालावधीत, आपण या देशात आवश्यक असलेले अन्न पिकविण्यास कदाचित सक्षम राहणार नाही.

भारताने अनेक प्रकारचे यश आत्तापर्यंत संपादन केले आहे. आपले अवकाश शास्त्रज्ञ मंगळ व चंद्रावर यान पाठवत आहेत; मोठ्या प्रमाणात व्यवसायिक घडामोडी व अभियांत्रिकी पराक्रम झाले. या सर्वांमध्ये सर्वात आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की कोणत्याही तंत्रज्ञानाशिवाय केवळ पारंपरिक ज्ञानाने आपले शेतकरी १२५ कोटीहून अधिक लोकांना जेवू घालत आहेत. ही देशातील सर्वात मोठी कामगिरी आहे.

 

परंतु दुर्दैवाने, आम्ही शेतकर्‍यांना एका कोपऱ्यात ढकलले आहे, शेतकऱ्यांना आपल्या मुलांनी शेती करावी असे वाटत नाही. एकीकडे आपण मातीची गुणवत्ता गमावत आहोत आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना आपली पुढची पिढी शेतीत जावी असे वाटत नाही. याचा अर्थ असा की आणखी पंचवीस वर्षांत आपण नक्कीच अन्नधान्याच्या मोठ्या संकटात सापडणार आहोत.

जेव्हा पाणी आणि अन्न नसते तेव्हा नागरी संघर्षाची वाढणारी पातळी देशाला अनेक प्रकारे नष्ट करू शकते. ज्या ठिकाणी ग्रामीण भागातील पाणी पूर्णपणे संपेल, तेथील लोक शहरी भागांमध्ये मोठ्या संख्येने स्थलांतर करतील. हे फार दूर नाही. पायाभूत सुविधा नसल्याने ते रस्त्यावर तळ ठोकतील. पण किती काळ? जेव्हा अन्न आणि पाणी नसेल तेव्हा ते घरांमध्ये घुसतील. मी काही विनाशाची भविष्यवाणी करणारा नाही, परंतु येत्या आठ ते दहा वर्षात आपण काही गंभीर पावले उचलली नाहीत तर तुम्हाला या परिस्थिती दिसतील.

सर्वसंपन्न माती- सर्वात अमूल्य भेट

आपल्याकडे, उष्णकटिबंधीय देशात पाण्याचा एकमेव स्त्रोत म्हणजे मान्सूनचा पाऊस. पंचेचाळीस ते साठ दिवसांच्या कालावधीत आपल्यावर मान्सून बरसतो. हे पाणी साठ दिवसांत खाली येते, नद्या, तलाव आणि जलाशयांना पुरवठा करण्यासाठी 365 दिवस जमिनीत ते पाणी आपल्याला जतन करावे लागते. भरपूर झाडे, झुडपे, व वृक्ष वनस्पतींशिवाय हे करण्याचा इतर कोणताही मार्ग नाही.

भरपूर प्रमाणात सेंद्रिय घटक असणे हेच पाणी मातीत टिकून राहण्याचे एकमेव कारण आहे. झाडांची पाने आणि प्राण्यांची विष्ठा हे या सेंद्रिय सामग्रीचा स्रोत आहेत. जिथे झाडे आणि जनावरांची विष्ठा नाही तेथे माती पाणी धरून ठेवू शकत नाही - ते वाहून जाते.

 

एखाद्या देशाची संपत्ती काय आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. ती विष्ठा आणि पाने आहेत! पुढच्या पिढीसाठी आपण देऊ शकणारी सर्वात मौल्यवान वस्तू म्हणजे व्यवसाय, पैसा किंवा सोने नाही - ती आहे समृद्ध माती.. समृद्ध मातीशिवाय, पाण्याचा उपलब्ध करणे अशक्यप्राय आहे.

जर आपण भारतात एक घनमीटर माती घेतली तर त्यामध्ये आढळणार्‍या प्राण्यांच्या प्रजातींची संख्या जगात सर्वाधिक आहे. म्हणूनच मातीचा दर्जा कमी होत असला तरीही, आपण थोडासा हातभार लावल्यास, परत उसळी घेण्याची शक्ती या मातीत आहे. समृद्ध वनस्पतीच्या इतिहासामुळे, या मातीमध्ये खूप जीवन समाविष्ट आहे. ही जमीन इतकी सुपीक आहे की आपण 12,000 वर्षांहून अधिक काळ या देशात शेती केली आहे. परंतु गेल्या चाळीस ते पन्नास वर्षांच्या कालावधीत आपण सर्व वृक्ष, वनस्पती काढून टाकल्यामुळे याचेच एक वाळवंटात परिवर्तन करत आहोत.

मातीचा आरोग्यावर कसा परिणाम होतो

भारतातल्या मातीची स्थिती इतकी बिकट आहे की पोषणाची पातळी भीषण गतीने खाली येत आहे. विशेषत: भारतीय भाजीपाल्यांच्या पोषणमूल्यात गेल्या पंचवीस वर्षांत तीस टक्के घट झाली आहे. जगात सगळीकडे डॉक्टर, लोकांना मांसाहारापासून शाकाहारी आहाराकडे जाण्यास सांगत आहेत. पण भारतात डॉक्टर तुम्हाला मांसाहाराकडे जाण्याचा सल्ला देतात. जेव्हा जग मांसाच्या सेवनापासून शाकाहारी जीवनाकडे जाण्याचा प्रयत्न करीत आहे, तेव्हा आपण मुख्यतः शाकाहारी राष्ट्र म्हणून जगणारे, मांसाकडे जाण्याचा प्रयत्न करीत आहोत कारण आपल्या अन्नामध्ये पुरेसे पोषण नाही.

याचे कारण आपण मातीची काळजी घेतलेली नाही. मातीतील सूक्ष्म पोषकद्रव्ये इतक्या भयानक रित्या कमी झाली आहेत की आपली तीन वर्षांपेक्षा कमी वयाच्या सत्तर टक्के मुले आज रक्तक्षयाने ग्रस्त आहेत.

जर आपण जंगलात जाऊन माती उचलली तर तिच्यात जीवन भरलेले आहे. माती अश्या प्रकारची असली पाहिजे. जर मातीची शक्ती कमकुवत झाली तर आपले शरीर दुर्बल होईल - केवळ पोषणाच्या बाबतीतच नव्हे तर अत्यंत मूलभूत मार्गाने. याचा अर्थ असा की आपण तयार केलेली पुढची पिढी आपल्यापेक्षा कमी दर्जाची असेल. हा मानवतेविरूद्धचा गुन्हा आहे. आपली पुढची पिढी आपल्यापेक्षा चांगली असली पाहिजे. जर ते आपल्यापेक्षा कमकुवत असतील तर आपण काहीतरी मूलभूत चुक केली आहे. हे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात घडत आहे, कारण माती आपली शक्ती गमावत आहे.

आत्ताच कृती करा!

1960 पूर्वी, भारतात बऱ्याच वेळा दुष्काळ पडायचे. त्यापैकी काही वेळा उन्हाळ्यात अवघ्या २-३ महिन्यांच्या कालावधीत लक्षावधी लोकांचा जीव गेला आहे. नद्या कोरड्या पडल्या आणि मातीचा दर्जा घसरला तर आपण पुन्हा अशा परिस्थितीकडे परत जाऊ. जर आपण आता योग्य गोष्टी न केल्यास, ही भूमी भविष्यात लोकांना जगू शकणार नाही.

Sadhguru flags off Cauvery Calling at Adiyogi on Jul 31, 2019

 

याच संदर्भात मी कावेरी कॉलिंग सुरू केले आहे . कावेरी खोरे जे सुमारे ८३,००० चौरस किलोमीटर एवढे पसरले आहे त्यात २४२ कोटी झाडे लावण्यास आम्ही शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहोत. याने त्या खोऱ्यातील एक तृतीयांश भाग छायेखाली येईल. कावेरी खोऱ्यात सुमारे ९०० अब्ज लीटर अतिरिक्त पाणी राखून ठेवले जाईल. नदीत सध्या प्रवाहित असलेल्या पाण्याच्या ४०% पेक्षा अधिक हे प्रमाण आहे.

हे करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शेतकर्‍यांना वनशेती वळवणे. आम्ही छोट्या प्रमाणात याची प्रात्यक्षिके केली आहेत जिथे आम्ही 69,760 शेतकर्‍यांना वृक्षशेतीकडे वळवले आणि पाच ते सात वर्षात त्यांची संपत्ती तीनशे ते आठशे टक्क्यांनी वाढली. एकदा कावेरी खोऱ्यात लागू करण्यायोग्य मोठ्या प्रमाणात पथदर्शी प्रकल्प म्हणून दाखविले की ते इतर नद्यांसाठीही राबवले जाऊ शकते.

खरोखर कृती करण्याची ही वेळ आहे. आणखी दहा ते पंचवीस वर्षे सतत प्रयत्न केल्यास आपण अगदी सहजपणे संपूर्ण परिस्थितीला उलट करू शकतो.

ACTION NOW - Cauvery Calling - Plant Trees

Editor's Note: २४२ कोटी झाडे लावण्याचं उद्दिष्ट गाठण्यासाठी मदतीचा हात द्या. यासाठी आपण स्वतःची आपली निधी उभारण्याची मोहीम सुरु करा आणि ती आपल्या आप्तेष्टांबरोबर शेअर करा! आपण किती झाडे लावण्यासाठी मदत करू शकाल? यासाठी निधी उभारण्यासाठी तुमची मोहीम सुरु करा. करा वृक्षारोपण ह्या वेबसाईटवर: CauveryCalling.Org or call 80009 80009. #CauveryCalling